वनात आग लागण्याची कारणे व त्याचे होणारे परिणाम त्यावर उपाय
वनातील आगींची काही मुख्य कारणे -
१. कोवळे व लुसलुशीत गवत मिळावे म्हणून स्थानिक लोक विशेषत: ज्याच्याकडे गुरे जास्त आहेत ते आगी लावतात.
२. उन्हाळयाचे हंगामात फुले देणाऱ्या मोहासारख्या वृक्षाचे खालील जागा स्वच्छ राहून अशी फुले गोळा करताना सुविधा व्हावी म्हणू फुले गोळा करणारी कुटुंबे आग लावतात.अशी आग नियंत्रणात न राहिल्यास तिच रूपांतर वणव्यात होते.
३. वन्यप्राण्यांची पारध करण्यासाठी किंवा त्यांना सापळ्यात ओढण्यासाठी आगी लावल्या जातात. वनगुन्हे कामातील पुरावा नष्ट करण्यासाठी आगी लावल्या जातात.
४. वनजमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी झाडीझुडपे साफ करून किंवा मोठया उभ्या झाडांना करवा घेऊन,ती सुकल्यानंतर त्यांना आग लावण्यात येते.
५. दाट वनक्षेत्रातील ग्रामस्थ रात्रीचे वेळी मनुष्य वस्तीत वन्यजीवांना शिरकाव करण्यास प्रतिबंध करण्यासाठी आग लावतात.
६. वनक्षेत्रात आलेले पर्यटक किंवा रस्त्यावरून चाललेले नागरिक अथवा ग्रामस्थ विड्यांची किंवा सिगारेटची जळकी थोटके, जळक्या आगकाडया टाकून वणव्यास कारणीभूत ठरतात.
७. वणवा प्रतिबंधक कामावर वेळेत नेमणुक न केल्यास, आगी लावल्या जाऊ शकतात.
८. पर्यटकांनी किंवा ग्रामस्थांनी वनक्षेत्रात अन्न शिजवून झाल्यानंतर ज्वलंत अग्नी न विझवता सोडला तर वणवे लागू शकतात.
९. वृक्षाच्या ढोलीत असलेल्या पोळयामधील मध गोळा करण्याकरीता आग लावून,त्यातून वणवे निर्माण होऊ शकतात.
१०. काही वेळा वीज वाहन नेणाच्या ताराचे घर्षण झाल्यामुळे वणवे लागू शकतात.
११. उन्हाळयात तेंदू पाने गोळा करण्याचा हगाम सुरू होण्यापूर्वी, विपूल व कोवळी पाने प्राप्त व्हावीत म्हणून मक्तेदार आगी लावतात.
१२. शेतीच्या वरच्या डोंगराळ क्षेत्रातून पावसाळयात पाण्यासह राख येवून ती शेतीसाठी उपयुक्त ठरल या भावनेने देखिल अशा वनक्षेत्रात आगी लावण्यात येतात.
१३. वनकर्मचार्यांनी अवैध वनगुन्हे करणाऱ्यांना अटकाव केल्यानंतर, आकसापोटी आगी लावल्या जातात.
वनातील आगीचे परिणाम
१. वनात पडलेली, वाळलेली झाडी झुडुपे जळाल्यामुळे जळावू लाकूड मिळण्याचे प्रमाण कमी होते. महिलांना इंधनासाठी दूरवर वणवण करावी लागते. कोवळी लहान झाडे नष्ट होऊन वनाच्छादन कमी होते आणि जंगल विरळ होते. सुपीक जमीन उघडी पडून हळूहळू भूभाग निकृष्ठ होतो.
२. गवत, पालापाचोळा आणि सेंद्रीय द्रव्ये यांची राख होते. त्यामुळे जमिनीतील सेंद्रीय घटक नष्ट होऊन वनस्पती निर्मितीस बाधा येते. चारा मिळेणासा होतो. आणि त्यामुळे पाळीव जनावरांची भटकंती वाढून ती दुबळी होतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते.
३. किटक आणि पक्षांची घरटी, अंडी, पिले जळून नष्ट होतात. त्यामुळे पक्ष्यांची संख्या कमी होऊन जैवविविधता ढासळते. पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव वाढतो आणि पिकांच्या उत्पन्नात घट होते.
४. वारंवार लागणाऱ्या वणव्यामुळे उघडया जमिनीवर पावसाचे पाणी थेट वेगाने पडते आणि त्यामुळे, सुपीक मातीचा थर वाहून जातो. यामुळे जमिनीची धुप होऊन पाणी धारण करण्याची क्षमता कमी होते. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर जाते. विहिरी/तळी वेळेपूर्वीच कोर्डी होऊ लागतात. सिंचनासाठी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते, उभी पिके वाळू लागतात आणि पिण्याच्या पाण्याचा तुटवडा होतो.
५. वनाधारित उदयोगांसाठी लागणाऱ्या वनोपज वनस्पतींना हानी पोहचते. प्रसंगी त्या पूर्ण जळतात. यामुळे बनोपजांच्या उत्पन्नात घट होऊन, वनाधारीत उदयोग मंदावतात व रोजगारांच्या संधी कमी होतात.
६. तृणभक्षी वन्यप्राण्यांचे खाद्य असलेले गवत व झाडीझुडपे जळतात. त्यामुळे तृणभक्षी वन्यप्राण्यांना चारा मिळेनासा होतो आणि त्यांना चारा व पाण्यासाठी शेतीकडे धाव घेण्यावाचून पर्याय उरत नाही.
७. वनांतील मौल्यवान, बहुगुणी औषधी वनस्पतींचे साठे नष्ट होतात. आणि त्याचा विपरित परिणाम ग्रामस्थांच्या स्वास्थ्यांवर होतो.
८. जैवविविधता नष्ट झाल्यामुळे सुधारीत पिकांचे व फळांचे वाण विकसित करण्यासाठी कष्टदायक ठरते.
९. वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे माती ठिसूळ होऊन पाऊस पडताच वाहून जाते त्यामुळे जास्त प्रमाणात मातीची धूप होते.
प्रतिबंधात्मक उपाय :-
१. स्थानिक समुदायांच्या वनोपज यांच्या गरजा भागवून, त्यांना रोजगार उपलब्ध करुन देणे आणि त्यांच्या सद्भावना प्राप्त करणे.
२. ग्रामस्थांच्या वनांपासून असणाऱ्या विधीवत मागण्या शक्य तितक्या मान्य करणे.
३. वनांचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांची सक्षमता वाढविणे.
४. ग्रामस्थांना वनांचे आगीपासून संरक्षण करण्याकरीता प्रशिक्षण देणे..
५. जाळ रेषांची वार्षिक देखभाल,साफ-सफाई, नियंत्रणाखाली जळाई करणे त्याकरीता वनक्षेत्रानुसार विविध रूंदीच्या जाळरेषा घेणे. सदर जाळरेषा वणव्याच्या संपूर्ण हंगामात नियमितपणे ज्वालाग्राही पदार्थ विरहीत राहतील याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
६. वर्ग-१ प्रतीच्या वनांसाठी उन्हाळयात १५ फेब्रुवारी ते १५ जून या काळात फायर वॉचर्स नेमणे.
७. आगीपासून गावातील वनांचे सातत्याने संरक्षण करणाऱ्या गावास पुरस्कार किंवा बक्षीस देणे.
८. आकाशवाणी, दुरदर्शन, ग्रामसभा, प्रसिध्दी आणि शिक्षण साहित्य याव्दारे स्थानिक समुदयांना, वनपर्यटकांना वनवणव्याच्या परिणामांची जाण करून देणे.
९. वनात स्वयंपाकासाठी/शेकोटीसाठी ज्वलंत विस्तव ठेवण्यास प्रतिबंधीत करणे.
१०. वनात विडी,सिगारेट ओढून त्यांची जळकी थोटके फेकू नयेत.
११. वनात आग लावणे हे कृत्य भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ आणि वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ नुसार निषिध्द असून, गुन्हेगारास दंड व शिक्षा करण्याची तरतूद त्यात केली आहे असे लोकांस जाहीरपणे कळविणे.
0 Comments