MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

वन्यजीव अपराध आणि विशेष तपास पथकांची गरज

 वन्यजीव अपराध आणि विशेष तपास पथकांची गरज 

राजेंद्र धोंगडे.Rajendra Dhongade
सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक

मित्रांनो, आज एका वेगळ्या विषयाला हात घालतो आहे. अलिकडेच काही मोठे वन्यजीव अपराध उघडकीस आले आहेत. मोठे अपराध म्हणजे ज्यात संघटीत गुन्हेगारी आहे, केलेल्या अपराधात राज्यातील आणि राज्याबाहेरच्या लोकांचा सहभाग आहे, अंतरराष्ट्रीय धागेदोरे आहेत, वन्यप्राणी हत्या किंवा त्या पासून बनवलेल्या चीजवस्तू चे प्रमाण मोठे आहे, अपराधात राजकीय पाठबळ असणारे किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे लोक आहेत, मोठी आर्थिक उलाढाल आहे, केवळ वन्यजीव गुन्हेच नव्हे तर अन्य गंभीर गुन्हे एकत्रित रित्या झाले आहेत... थोडक्यात सांगायचे तर  वन्यजीव गुन्हे आता जंगलाजवळ रहाणाऱ्या वनवासी ( आदिवासी आणि इतर)  व्यक्ती पुरते मर्यादित राहिले नसून त्यांची साखळी दूर पर्यंत जाणारी आहे. त्या मुळे केवळ स्थानिक पातळीवर वनक्षेत्रपाल किंवा सहाय्यक वनसंरक्षक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात तपास केला आणि न्यायालयात फिर्याद दाखल केली अशी प्रकरणे दुर्मिळ होत आहेत. अशा परिस्थितीत केवळ वन विभाग नव्हे तर पोलिस यंत्रणा, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो ( WCCB ) कस्टम्स, रेव्हेन्यू इंटेलिजन्स, सी बी आय, नार्कोटिक्स, एन आय ए, ईन्फोर्समेंट डायरेक्टोरेट अशा विविध तपास यंत्रणाना समन्वयाने काम करावे लागणार आहे. 

अशा गंभीर वन्यजीव गुन्हे प्रकरणात , उच्च पातळीवरील वनाधिकाऱ्यास विशेष तपास पथकाचा  ( स्पेशल इनव्हेस्टीगेशन टीम) प्रमुख नेमून मदतीला जाणकार अधिकाऱ्यांचा संघ देणे आवश्यक ठरते आहे. मध्य चंद्रपूर वन विभागात जे सराईत तस्कर ( पोचर) पकडण्यात आले तिथे एस आय टी काम करते आहे. केंद्र सरकारने देखील त्या प्रकरणात एक एस आय टी गठित केली आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र यांनी देखील एक एस आय टी बनविली आहे. जळगाव वन विभागात चाळीसगाव परिसरात वन्यजीव गुन्हा घडला तेथे देखील एक एस आय टी काम करते आहे. 

या पूर्वी कोल्हापूर वन वृत्तात एक एस आय टी ( SIT) ने काम केले आहे, पेंच राष्ट्रीय उद्यानात काम केले आहे आणि मेळघाटात एक प्रयत्न झालेला आहे.

वन विभागाला एस आय टी गठित करून समन्वयाने  काम करण्याची सवय अद्याप झालेली नाही आणि तसा अनुभव देखील कमी आहे. परंतु एकत्रित काम करता करता, या कार्यशैलीत सुधारणा होत जातील यात शंका नाही. सर्व प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व वन्यजीव तस्करी वर आळा बसावा हीच सर्वांची अपेक्षा असणार.

राजेंद्र धोंगडे.Rajendra Dhongade
सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक

Post a Comment

0 Comments