MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानव मृत्यू : क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी कार्यवाहीचा प्रोटोकॉल

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानव मृत्यू झाल्यास करावयाची कार्यवाही

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानवाचा मृत्यू झाल्यास अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये तात्काळ, योग्य व नियमानुसार कार्यवाही होणे आवश्यक आहे. घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी, आवश्यक पुरावे व वन्यप्राण्यांच्या उपस्थितीच्या खुणांची नोंद, पोलीस विभागाशी समन्वय, पंचनामा, शवविच्छेदन तसेच मृत्यूचे कारण यांची योग्य पडताळणी करणे महत्त्वाचे आहे.

अशा प्रकरणांमध्ये संपूर्ण राज्यात क्षेत्रीय स्तरावर कार्यवाहीत एकसूत्रता राहावी आणि आवश्यक तपशीलवार चौकशी वेळेत पूर्ण व्हावी, या उद्देशाने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या कार्यालयाकडून दि. 02.01.2026 रोजी प्रोटोकॉल जारी करण्यात आला आहे. या प्रोटोकॉलमध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानव मृत्यू झाल्यानंतर वन विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. 

तसेच, “वन्यप्राण्यामुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान याकरिता नुकसान भरपाई प्रदान करणे, महाराष्ट्र अधिनियम, २०२३” मधील तरतुदींच्या अनुषंगाने नुकसानभरपाईच्या प्रकरणांची तपासणी करणे आवश्यक आहे. विशेषतः वन्यप्राणी रस्ता ओलांडताना झालेल्या वाहन अपघातामुळे झालेली इजा किंवा नुकसान नुकसानभरपाईकरिता विचारात घेतले जाणार नसल्याचे संबंधित पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक घटनेची वस्तुनिष्ठ पडताळणी करूनच पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. 

 वन्यप्राण्याचे हल्ल्यात मानव मृत्यू झाल्यास त्या प्रकरणी क्षेत्रीय स्तरावर होणा-या कार्यवाहीत एक सुत्रता राहावी यासाठी खाली प्रमाणे प्रोटोकॉल जारी करण्यात येत आहे.

१. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मानवी मृत्यू झाल्याची माहिती मिळताच जवळचे वन कर्मचारी यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचावे.

२. प्राथमिक पाहणी केल्यावर त्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलीस तसेच वरिष्ठ वन अधिकारी यांना तात्काळ कळवावे आणि घटनास्थळ सुरक्षित करावे, जेणेकरून पगमार्क्स, ओढण्याच्या खुणा, रक्ताचे डाग, वनस्पतींचे नुकसान किंवा इतर वन्यप्राण्यांच्या उपस्थितीच्या खुणा नष्ट होणार नाहीत.

३. संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पोलीस अधिकारी यांसोबत घटनास्थळाची संयुक्त पाहणी करावी आणि चाव्याच्या खुणा, नखांच्या जखमा, चिरडण्याच्या खुणा, ओढण्याच्या खुणा किंवा खादानाच्या खुणा यांसारख्या जखमांच्या प्रकारांची काळजीपूर्वक तपासणी करून योग्य नोंद करण्यात यावी.

४. मृतदेह हलविण्यापूर्वी शक्य असल्यास मृतदेह, जखमा व सभोवतालच्या परिसराचे जिओ-टॅग व वेळेसह (टाईम-स्टॅम्प) छायाचित्रे व व्हिडिओ घेण्यात यावेत.

५. पोलीस विभागामार्फत पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात यावे. वन कर्मचारी या कामात पूर्ण सहकार्य करतील.

६. वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये मृत्यूचे कारण स्पष्टपणे नमूद आहे तसेच जखमा वन्यप्राण्यांच्या हल्ल्याशी सुसंगत आहेत की नाही, हे स्पष्ट असल्याची खात्री करावी.

7. सदर मृत्यू अपघात, हल्ला, विद्युत प्रवाहाचा धक्का, विषबाधा किंवा इतर कोणत्याही वन्यप्राणी विरहित कारणामुळे झालेला नाही, याची विशेषतः खात्री व पडताळणी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी करावी व तसे प्रमाणित करावे.

8. पोलीस तपास, शवविच्छेदन अहवाल आणि वनविभागाच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय पुराव्यांची संयुक्त पडताळणी नंतर मृत्यू वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झाल्याचे सहाय्यक वनसंरक्षक यांनी प्रमाणित करावे व पुढील कार्यवाही करण्यात यावी.

9. वरील घटनेची माहिती संदर्भीय पत्रान्वये दिलेल्या ‘प्रपत्र-अ’ मध्ये घटना निर्देशानुसार आल्याचे २४ तासाचे आत उप वनसंरक्षक/विभागीय वन अधिकारी यांच्या स्वाक्षरीने मुख्य वन्यजीव रक्षक यांना ई-मेल द्वारे सादर करावी.

क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांनी प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करावे

सर्व क्षेत्रीय वन कर्मचारी यांनी वरील 1 ते 9 मुद्द्यांनुसार संवेदनशीलतेने व नियमानुसार कार्यवाही करावी. आवश्यकतेनुसार स्थानिक जनप्रतिनिधींच्या सहकार्याने कार्यवाही करण्यात यावी. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानव मृत्यू झालेल्या प्रत्येक प्रकरणातील सर्व कार्यवाही, तपासणी व संबंधित बाबींची योग्य प्रकारे नोंद ठेवावी.

सदर प्रोटोकॉलचे पूर्ण पालन होईल, याची संबंधित अधिकाऱ्यांनी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. प्रोटोकॉलनुसार कार्यवाही करण्यात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा झाल्यास, त्याची गांभीर्याने दखल घेऊन नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. 

संबंधी पोस्ट 

1.  वन्यप्राण्यामुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान याकरिता नुकसान भरपाई प्रदान करणे, महाराष्ट्र अधिनियम, 2023

2. मानव–वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये तात्काळ प्रतिसाद व कार्यवाही SOP : 2026

Post a Comment

0 Comments