वनगुन्ह्या बद्दलची कागदपत्रे तयार करताना सर्वांत पहिला कागद कोणता ? याबाबत श्री राजेन्द्र धोंगडे सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक यांचे मार्गदर्शन
वन विभागाचे असंख्य क्षेत्रीय अधिकारी वर्षानुवर्षे वनगुन्ह्या बद्दलची कागदपत्रे करीत असून हा प्रश्न कधी पडलाच नाही, तर आज हा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण काय ? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे आणि "पी ओ आर" POR पेक्षा वेगळा कोणता कागद असणार ? हे प्रश्नरुपी उत्तर सुद्धा अनेकांच्या मनात तयार असणार.
पण वन - वन्यजीव गुन्ह्यांची जी न्यायालयीन प्रकरणे विभागा विरोधात गेली किंवा आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाला नाही त्या निकालांचा अभ्यास वेगळीच कारणे अधोरेखित करतो आहे.
वन अधिकाऱ्यास गुन्हा आढळून आल्यास त्याने "पी ओ आर" नोंदवायचा आहे आणि अन्य व्यक्ती कडून माहिती मिळाल्यास जागेवर जाऊन खात्री करून "पी ओ आर" नोंदवायचा आहे असे महाराष्ट्र वन संहिता खंड - २ बाब क्र.६.१२ मध्ये नमूद आहे. जागेवरील स्थिती बारकाईने लक्षात घेतली आणि तर्कशुद्ध विचार केला तर लक्षात असे येईल कि गुन्हा स्थळाचे व्यवस्थीत निरीक्षण केल्याशीवाय आणि पुराव्यांच्या नोंदी घेतल्या शिवाय "पी ओ आर" चे प्रपत्र भरताच येणार नाही. वृक्ष तोड असेल तर थूटांची प्रजाती, उंची, गोलाई, नग असल्यास त्याचे आकारमान इ इ... अतिक्रमण असेल तर चतु:सीमा , बाजूंची लांबी, पॉलिगॉन, पिकांचे वर्णन... वन्यजीव गुन्हा असेल तर प्राण्यांची प्रजाती, लिंग, आकारमान, जखमांचे वर्णन इ इ...
महाराष्ट्र वन संहिता खंड - २ बाब क्र.६.१२ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तात्पर्य, असे स्थळ वर्णन करणारा कागद , पंच सोबत असतील तर पंचनामा आणि नसेल तर स्वतःलिहिलेला अहवाल ( स्पेशल रिपोर्ट) हा पहिला कागद ठरतो आणि त्या आधारे लिहीला जाणारा पीओआर हा नंतरचा कागद ठरतो. भारतीय साक्ष अधिनियमाचा सतत अभ्यास आणि वापर करणाऱ्या न्यायिक अधिकार्यांनी नेमका हाच घटनाक्रम विचारात घेऊन, पी ओ आर लेखन कालावधी, पंचनामा लेखन कालावधी, जप्तीनामा लेखन कालावधी , वन्यजीव प्रकरणी शव विच्छेदन कालावधी यांतील तफावत आणि विसंगती अनेक निकालात उघड केली आणि हे दस्तऐवज संशयातीत पुरावे म्हणून विचारात घेतले जाऊ शकत नाहीत असे निष्कर्ष काढले. परिणामी आरोपींना संशयाचा फायदा मिळून ते सुटले आहेत.
(पी ओ आर ) ची तुलना पोलिस एफ आय आर शी केली जाणार नाही याचे भान वन अधिकार्यास ठेवावेच लागेल)
सुधारित वन अपराधाचे पहिले प्रतिवृत पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आरोपींचे वकील काकदृष्टी ठेवून असतात ,न्यायालये याबाबत गंभीर आहेत परंतु वन अधिकारी कितपत गंभीर आहे यावर अशा प्रकरणांचे भवितव्य अवलंबून आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
श्री राजेन्द्र धोंगडे
सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक
या लेखात, आम्ही आपणाला वनगुन्ह्या बद्दलची कागदपत्रे करताना सर्वांत पहिला कागद कोणता ? या विषयी माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
0 Comments