भारतीय वन अधिनियम, 1927 कलम 30 – वृक्ष, इत्यादी राखून ठेवण्याबाबत अधिसूचना निर्गमित करण्याची शक्ती
30. वृक्ष, इत्यादी राखून ठेवण्याबाबत अधिसूचना निर्गमित करण्याची शक्ती.-
राज्य शासन राजपत्रात अधिसूचनेद्वारे, -
(ए) एखाद्या संरक्षित वनातील कोणतेही वृक्ष किंवा कोणत्याही वर्गाचे वृक्ष, त्या अधिसूचनेद्वारे निश्चित केलेल्या तारखेपासून राखीव ठेवण्यात आले आहे, असे जाहीर करू शकेल;
(बी) अशा वनाचा उक्त अधिसूचनेत निर्दिष्ट केलेला कोणताही भाग, तीस वर्षांहून अधिक होणार नाही, अशी जी मुदत राज्य शासनास योग्य वाटेल, त्या मुदतीपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे, आणि अशा भागावर कोणत्याही व्यक्तीचे, जे कोणतेही वैयक्तिक हक्क असतील, ते अशा मुदतीपर्यंत निलंबित ठेवण्यात आले आहेत, असे जाहीर करू शकेल, मात्र अशा वनाचा शिल्लक राहिलेला भाग, हा अशा रीतीने हक्कांचे वाजवी उपभोगासाठी पुरेसा असेल व तो वाजवीरीत्या सोईस्कर अशा ठिकाणी असेल;
किंवा
(सी) उपरोक्त प्रमाणे निश्चित केलेल्या तारखेपासून अशा कोणत्याही वनात खाणी खणून दगड काढण्यास किंवा चुन्याची किंवा कोळशाची भट्टी लावण्यास किंवा अशा वनातील कोणतेही वन उत्पादन गोळा करण्यास किंवा ते तयार करण्याची कोणतीही क्रिया त्यावर करण्यास किंवा ते काढून नेण्यास अशा कोणत्याही वनातील कोणतीही जमीन लागवड करण्यासाठी, इमारती बांधण्यासाठी, गुरांचे कळप ठेवण्यासाठी किंवा कोणत्याही इतर प्रयोजनासाठी विच्छेदन करण्यास किंवा ती जमीन झाडे तोडून साफ करण्यास मनाई करू शकेल.
31. अशा अधिसूचनेचा अनुवाद, शेजारच्या परिसरात प्रसिद्ध करणे.-
जिल्हाधिकारी हा, कलम 30 खाली निर्गमित प्रत्येक अधिसूचनेचा स्थानिक देशी भाषेतील अनुवाद, त्या अधिसूचनेत समाविष्ट करण्यात आलेल्या वनाच्या शेजारी असलेल्या प्रत्येक शहरातील व गावातील एखादा ठळक जागी लावण्याची व्यवस्था करेल.
संबंधी पोस्ट
1. भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 33
3. संरक्षित वनातील कांदळवन वृक्ष राखीव घोषित | कांदळवन संरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाची अधिसूचना 2012
-------------------
भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 30 अंतर्गत राज्य शासनाला संरक्षित वनातील विशिष्ट वृक्ष राखीव ठेवण्याची तसेच संरक्षित वनाच्या विशिष्ट भागाबाबत बंदी किंवा निर्बंध घालण्याची अधिसूचना काढण्याचा अधिकार आहे.
भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 30 अंतर्गत निर्गमित अधिसूचनेचे किंवा कलम 32 अन्वये केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबतची शास्ती भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 33 मध्ये नमूद करण्यात आली आहे.
जन विश्वास (तरतुदींमध्ये सुधारणा) अधिनियम, 2023 अंतर्गत कलम 33 मध्ये सुधारणा करण्यात आली असून, भारतीय वन अधिनियम 1927 मध्ये नवीन कलम 33(1A) समाविष्ट करण्यात आले आहे.
---------------------
0 Comments