MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

महाराष्ट्र वन ( सुधारणा) नियमावली 2019

भारतीय वन अधिनियम, 1927

क्रमांक एस-10/2016/प्र.क्र.133/फ-3.— भारतीय वन अधिनियम, 1927 (1927 चा 16) कलम 26, 32 व 76 मधील शक्ती आणि इतर सर्व शक्तींचा वापर करून, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र वन नियमावली, 2014 यात सुधारणा करण्यासाठी याद्वारे, खालील नियम करीत आहे :—

1. या नियमांना महाराष्ट्र वन (सुधारणा) नियमावली, 2019 असे म्हणावे.

2. महाराष्ट्र वन नियमावली, 2014 (यात यापुढे जिचा निर्देश “मुख्य नियमावली” असा केला आहे) याच्या नियम 10 मधील उप-नियम (10) मधील स्पष्टीकरण वगळण्यात येईल.

3. मुख्य नियमांच्या प्रकरण-सहा नंतर, पुढील प्रकरण समाविष्ट करण्यात येईल :—

“प्रकरण (VI-अ)”

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 च्या तरतुदींन्वये वन हक्कांची नोंद करणे आणि वनजमिनीचे वळतीकरण करणे (कलम 26 व 32)

30-ए व्याख्या :
(1) या प्रकरणाच्या व त्यात निर्दिष्ट केलेल्या अनुसूचीच्या प्रयोजनार्थ, संदर्भानुसार अन्यथा दुसरा अर्थ आवश्यक नसेल तर,—

(अ) “जिल्हास्तरीय समिती” याचा अर्थ वन हक्क अधिनियमाच्या कलम 6 च्या उप-कलम (5) अन्वये गठित केलेली जिल्हास्तरीय समिती, असा आहे ;

(ब) “वन हक्क अधिनियम” याचा अर्थ, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 (2007 चा 2), असा आहे.

(2) या प्रकरणात व यात निर्दिष्ट केलेल्या अनुसूचीत वापरलेले परंतु यात व्याख्या न केलेल्या शब्द व शब्दप्रयोग यांना, वन हक्क अधिनियमात अनुक्रमे जो अर्थ नेमून देण्यात आला असेल तोच अर्थ असेल.

30-ब वनहक्क अधिनियमाखालील वन हक्कांची नोंद करणे.—

नियम 10 व 30 यांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी वनहक्कधारकाच्या बाबतीत जेव्हा वन हक्क अभिलेखास जिल्हास्तरीय समितीकडून अंतिमतः मान्यता दिली जाते तेव्हा, अशा प्रकरणांमध्ये वनहक्क अधिनियमाच्या तरतुदींन्वये वनजमिनीमध्ये मान्य केलेले आणि निहित केलेले वन हक्क या प्रकरणात अंतर्भूत केलेल्या तरतुदींनुसार नोंदविण्यात येतील व परिरक्षित करण्यात येतील.

30-सी वैयक्तिक वन हक्कांची नोंदवही.—

उप वनसंरक्षक हा, वनहक्क अधिनियमाच्या तरतुदींन्वये जिल्हास्तरीय समितीने वन जमिनीतील कोणत्याही व्यक्तींच्या बाबतीत मान्य केलेल्या व निहित केलेल्या सर्व वनहक्कांचा तपशील अंतर्भूत असणाऱ्या अनुसूची-एफ मध्ये दिलेल्या नमुन्यात “वैयक्तिक वन हक्कांची नोंदवही” ठेवतील.

30-डी सामूहिक वन हक्कांची नोंदवही.— 

उप वनसंरक्षक हा, वन हक्क अधिनियमाच्या तरतुदींन्वये जिल्हास्तरीय समितीने वन जमिनीतील सामूहिक वन हक्क म्हणून व्यक्तींच्या, गटाच्या बाबतीत मान्य केलेल्या व निहित केलेल्या सर्व वन हक्कांचा तपशील अंतर्भूत असणाऱ्या अनुसूची-जी मध्ये दिलेल्या नमुन्यात “सामूहिक वन हक्कांची नोंदवही” ठेवतील.

30-ई स्वतः लागवड करण्याच्या वन हक्कांचा वापर करण्याबाबतची नोंदवही.— 

वनपरिक्षेत्र अधिकारी हा, स्वतः किंवा इतर कोणत्याही दुय्यम अधिकाऱ्यामार्फत लागवडीच्या प्रत्येक हंगामामध्ये स्वतः लागवड करण्याच्या वन हक्काच्या वापराचे नियमितपणे संनियंत्रण करतील.

आणि अनुसूची-एच मध्ये दिलेल्या नमुन्यात “स्वतः लागवड करण्याच्या वन हक्कांचा वापर करण्याबाबतच्या नोंदवहीमध्ये” निरीक्षणे नोंदवतील. वन परिक्षेत्र अधिकारी, लागवडीच्या प्रत्येक हंगामामधील वन हक्कांचा वापर करण्याबाबतचा सर्वसमावेशक अहवाल उप वनसंरक्षकांकडे सादर करतील.

30-एफ वन हक्काच्या अमान्य केलेल्या दाव्यांची नोंदवही.—

उप वनसंरक्षक हा, वन हक्क अधिनियमाच्या तरतुदींन्वये अमान्य केलेल्या वन हक्कांच्या सर्व दाव्यांचा तपशील अनुसूची-आय मध्ये दिलेल्या नमुन्यात “वन हक्क अमान्य केलेल्या दाव्यांची नोंदवही” ठेवतील.

30-जी वन हक्क अभिलेखाच्या प्रती देणे :—

उप वनसंरक्षक याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या प्रभारी वन अधिकाऱ्याने याबाबतीत अशाप्रकारे प्राधिकृत केलेले असेल तर, वन परिक्षेत्र अधिकारी किंवा लेखापाल किंवा वनपालाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाची नसलेली कोणतीही व्यक्ती, या नियमांमध्ये विहित केलेल्या नोंदवहीमध्ये ठेवलेल्या प्रमाणे वेळोवेळी अद्ययावत केलेल्या नोंदीनुसार अनुसूची-जे मध्ये दिलेल्या नमुन्यातील “वनहक्कांचे दस्तऐवज” कोणत्याही वन हक्कधारकास, त्याच्या लेखी अर्जावरून देईल. वन हक्कांचे दस्तऐवज, एका वित्तीय वर्षात पाच प्रतींपर्यंत, विनामूल्य देण्यात येतील.

30-एच वारसाहक्काने वनहक्कांचे हस्तांतरण आणि त्याबाबतची फेरफार नोंदवही.—

(1) जर या प्रकरणामध्ये विहित केलेल्या नोंदवह्यांपैकी कोणत्याही नोंदवहीत नोंद केलेल्या कोणत्याही वन हक्कांचे वनहक्क अधिनियमाच्या तरतुदींनुसार वारसाहक्काने हस्तांतरण करावयाचे असेल तर, वन हक्कांचा वारसाहक्क असणारी व्यक्ती, त्या वनांच्या प्रभारी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे वारसा हक्काच्या दाव्यास पुष्टी देणाऱ्या, ग्रामसभेने संमत केलेल्या ठरावासह लेखी अर्ज करील. वन हक्कांच्या फेरफाराच्या आदेशासाठी अर्ज, संबंधित प्राधिकृत सहायक वन संरक्षकाकडे पाठविण्यात येईल.

(2) मुख्य वनसंरक्षक / वनसंरक्षक त्या वन विभागामध्ये असे फेरफार आदेश संमत करण्यासाठी त्या वन विभागात सेवा बजावणाऱ्या एका किंवा अधिक सहायक वन संरक्षकांना प्राधिकृत करू शकतील.

(3) वन हक्कांच्या फेरफाराच्या सर्व आदेशांची अनुसूची-के मध्ये दिलेल्या नमुन्यातील “वैयक्तिक वन हक्काच्या फेरफाराची नोंदवही” यामध्ये किंवा, यथास्थिती, अनुसूची-एल मध्ये दिलेल्या नमुन्यातील “सामूहिक वन हक्कांच्या फेरफाराची नोंदवही” यामध्ये नोंद करण्यात येईल.

(4) या नियमांनुसार ठेवण्यात झालेल्या नोंदवह्यांमधील संबंधित नोंदी उक्त नोंदवह्यांमध्ये वन हक्क उत्तराधिकाऱ्यांची नावे आणि इतर संबंधित तपशील समाविष्ट करण्यासाठी फेरफार आदेशांनुसार रीतसर अद्यावत करण्यात येतील.

30-आय फेरफार नोंदीमधील दुरुस्त्या.—

न्यायालयीन आदेश किंवा उत्तराधिकार प्रमाणपत्र मिळाल्यावर न्यायालयीन आदेशानुसार किंवा उत्तराधिकार प्रमाणपत्रानुसार फेरफार नोंदीमध्ये तत्परतेने दुरुस्ती करण्यात येईल.

30-जे अपील.—

या नियमांन्वये सहायक वन संरक्षकाने संमत केलेल्या फेरफार आदेशाद्वारे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस, उप वनसंरक्षकाकडे अपील करता येईल.

30-के राखीव व संरक्षित वनांच्या नोंदवहीचा अविभाज्य भाग.— 

या प्रकरणान्वये ठेवलेल्या वन हक्क नोंदवह्यांना ह्या वन विभागाने ठेवलेल्या राखीव व संरक्षित वनांच्या नोंदवहीचा अविभाज्य भाग असल्याचे समजण्यात येईल.

30-एल सुखसुविधांसाठी वन जमिनीचे वळतीकरण (अन्य वापर).— 

उप वनसंरक्षक हा, अनुसूची-एम मध्ये दिलेल्या नमुन्यातील “वन हक्क अधिनियमाखालील सुखसुविधांसाठी वळती केलेल्या वन जमिनींची नोंदवही” ठेवील, ज्यात वन हक्क अधिनियमाच्या कलम 3 च्या उप कलम (2) च्या तरतुदीनुसार वन जमिनीच्या वळतीकरणाचा तपशील नोंदवण्यात येईल.

30-एम वन (संवर्धन) अधिनियम, 1980 अन्वये वन जमिनीचे वळतीकरण करणे.—

उप वनसंरक्षक हा, अनुसूची-एन मध्ये दिलेल्या नमुन्यातील “वन (संवर्धन) अधिनियम, 1980 अन्वये वळती केलेल्या वन जमिनीची नोंदवही” ठेवील, ज्यात वन (संवर्धन) अधिनियम, 1980 (1980 चा 69) याच्या तरतुदींनुसार वन जमिनीच्या वळतीकरणाचा तपशील नोंदवण्यात येईल.

4. मुख्य नियमांच्या अनुसूची-ए मधील तक्त्याखालील परिच्छेद 1 ऐवजी पुढील परिच्छेद दाखल करण्यात येईल :—

1 सदर प्रपत्र, भारतीय वन अधिनियम, 1927 (1927 चा 16) याच्या कलम 15 च्या उप-कलम (2) च्या खंड (क) अन्वये पुढे चालू करण्यात आलेल्या हक्कांच्या किंवा राज्य शासनाने मंजूर केलेल्या कोणत्याही सवलतींच्या आधारे भरण्यात येईल. या हक्कांचा किंवा सवलतींचा वापर त्यांसाठी विनिर्दिष्ट केलेल्या शर्तींना अधीन राहून करण्यात येईल.”

5. मुख्य नियमावलीच्या अनुसूची-ई नंतर पुढील अनुसूची जादा दाखल करण्यात येतील :—



   

महाराष्ट्र शासनाने भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 26, 32 व 76 अन्वये महाराष्ट्र वन नियमावली, 2014 मध्ये सुधारणा करून महाराष्ट्र वन (सुधारणा) नियमावली, 2019 लागू केली. या सुधारणांमध्ये वन हक्क अधिनियम, 2006 अंतर्गत मान्य झालेल्या वैयक्तिक व सामूहिक वन हक्कांची नोंद ठेवणे, वन हक्कांचे दस्तऐवज देणे, वारसाहक्काने होणारे हस्तांतरण व फेरफार नोंदी, दुरुस्ती आणि अपील याबाबत तरतुदी करण्यात आल्या आहेत. तसेच वन हक्क अधिनियमांतर्गत सुखसुविधांसाठी वळती केलेल्या वन जमिनीची आणि वन (संवर्धन) अधिनियम, 1980 अंतर्गत वळती केलेल्या वन जमिनीची स्वतंत्र नोंदवही ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments