MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

अंजन वृक्ष विषयी माहिती

 दुष्काळातही तग धरणाऱ्या अंजनाची संवर्धन आणि संगोपनाची आवश्यकता

अंजन वृक्ष विषयी माहिती Anjan tree information in marathi 

वनस्पतिशास्त्रीय नाव: हार्डविकिया बायनाटा Hardwickia binata Roxb,

कुळ: Caesalpinaceae, 

संस्कृत: अंजन, 

हिंदी: अंजन,

कन्नड: कम्मारा, 

मल्याळम: आचा, 

तमिळ: आचा,

तेलुगु: येपी

 अंजन वृक्ष कमी पाण्यावर अधिक काळापर्यंत तग धरून राहणारा वृक्ष म्हणजे अंजन होय. मराठवाडा सारख्या सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या भागात अंजनाची लागवड करुन त्यांचे संवर्धन आणि संगोपनाची आवश्यकता आहे.

Anjan vruksh

       अंजन ही धीम्या गतीने वाढणारी कोरड्या पर्णपाती जंगलातील वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती आहे. दीर्घकाळ दुष्काळ सहन करण्याची याची क्षमता आहे. हा वृक्ष ३०० ते ६०० मिलिमीटर पावसाच्या प्रदेशात (मराठवाडा, विदर्भ, खानदेश) उत्तम प्रकारे वाढतो. पडीक, बरड, मुरमाड, खडकाळ आणि उथळ प्रकारच्या जमिनीमध्ये हा वाढू शकतो. झाडाच्या पानांमध्ये १० ते १२ टक्के प्रथिने असतात. याचे वनस्पतीशास्त्रीय नाव हार्डविकिया बायनाटा असून अंजन, इरुला, कम्मारा अशी अनेक नावे आहेत.अंजनाचा वृक्ष सर्वसाधारणपणे शुष्क पानझडीच्या वनात आढळतो. हा वृक्ष सरासरी १५ ते २५ मीटर उंच वाढतो. खोड खरबरीत तपकिरी रंगाचे असून साल भेगाळलेली दिसते. जसजसे झाडाचे वय वाढत जाते त्याप्रमाणे खोडाचा रंग गडद होत जातो. पाने संयुक्तपर्णी द्विदल म्हणजेच दोन पर्णिकांची मिळून बनलेली असतात. आपटयाच्या पानासारखी दिसतात.अंजन आणि कांचन एकाच कुळातील आहेत. 

 कांचन आणि अंजनाच्या पानांमधील मुख्य फरक म्हणजे पर्णिकांची रचना. अंजनाचे पान दोन देठविरहित पर्णिकांचे बनलेले असून दोन्ही पर्णिका एकमेकांपासून पूर्णपणे सुट्या असतात याउलट कांचनाच्या पर्णिका मध्यशिरेला जोडल्या जाऊन मध्यावर घडी पडणारे पान तयार होते. अंजनाच्या या पर्णिका साधारणपणे 2.5 ते 7.5 सेमी लांब असतात. फुले छोटी, नाजूक, पिवळसर रंगाची व सहज नजरेत न भरणारी असतात. फुले हिवाळ्यात येतात.शेंगा चपट्या, लांबट आकाराच्या, दोन्ही टोकांकडे निमुळत्या, आणि खालच्या टोकाजवळ एक बी धारण करणाऱ्या असतात. अंजनाचा पाला हा जनावरांसाठी उपयुक्त चारा आहेे. या वनस्पतीचे लाकुड तांबडया रंगाचे व अतिशय कठिण असते .भारतातले सर्वात जड लाकुड अशी याची ओळख आहे. अंजनवृक्षाची एप्रिलमधे पानझड होऊन मे ते ऑगस्ट दरम्यान झाडाला नवी पालवी फुटते. साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबर हा अंजनाच्या उमलण्याचा काळ असतो. यानंतर लगेचच फळे तयार होतात.अंजनाचा वृक्ष शुष्क प्रदेशांत नैसर्गिकरीत्या आढळतो. उथळ, वालुकामिश्रित, खडकाळ जमीन याच्या वाढीसाठी पोषक असते. अंजनाची मुळे लांब जमिनीत खोलवर शिरून खडकांच्या भेगांमधून लांबवर पसरतात. त्यामुळे पाण्याशिवायही झाड व्यवस्थितपणे जिवंत राहू शकते. अंजनाच्या सालीपासून मिळणाऱ्या धाग्यांपासून दोर तयार करतात.पानांमधे साधारण ९% प्रथिने असतात, त्यामुळे जनावारांसाठी पौष्टिक खाद्य म्हणून वापर केला जातो.अंजनाचे लाकूड अतिशय टिकाऊ म्हणून प्रसिद्ध आहे. अंजनाचे लाकूड प्रामुख्याने शेतीची उपकरणे, बैलगाड्या, चाके व इमारतींच्या बांधकामासाठी वापरले जाते. अंजनाचा डिंक, मुळांचा चीक आणि पानांचा रस यांचा उपयोग प्रमेहावर (गुप्तरोगावर) औषध म्हणून केला जातो. 

 यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा वृक्ष उणे ५ डिग्री ते ४८ डिग्री तापमान सहन करणारा आहे.शेतातील पिकांचे गर्मी आणि थंडी पासून संरक्षण करतो.

Post a Comment

0 Comments