MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

भारताचे पहिले वन संरक्षक : डॉ. अलेक्झांडर गिब्सन

 भारताचे पहिले वन संरक्षक डॉ. अलेक्झांडर गिब्सन : दी फरगॉटन फर्स्ट फॉरेस्ट कन्झर्वर ऑफ इंडिया !               

     जुन्नर- ओझर रस्त्यावर येडगाव धरणाच्या जलाशयाच्या काठावरचं निर्जन ठिकाण. वर निमुळतं टोकंच दिसेल असा कुणीतरी अज्ञाताने बांधलेला दगडी पँगोडा तुमचं लांबून लक्ष वेधून घेतो. दाट झाडीतून रस्ता काढत आणि गुंता झालेल्या वेली बाजूला सारत तुम्ही त्या दगडी स्तंभाजवळ पोहोचता. 



" भारताचे पहिले वनसंरक्षक म्हणून दिनांक २२ मार्च १८४७ रोजी यांची नेमणूक झाली. भारतातील वनशास्राचा मूलभूत पाया रोवून त्यांनी संस्मरणीय कामगिरी बजावली. वनस्पती शास्रज्ञ व वन शास्रज्ञ या नात्याने त्यांची कारकिर्द भारतीय वनशास्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यायोग्य आहे. " 

    हा मजकूर कोरलेला आहे त्या दगडी स्तंभावर... डॉ.अलेक्झांडर गिब्सनच्या सन्मानार्थ ! जवळच  गिब्सनच्या लेझी, हेक्टर आणि टिपू या तीन पाळीव कुत्र्यांच्या दगडी समाध्याही आढळतात. त्यावर इ.स. १८४६ सालाची नोंद आहे.जिथं बसून गिब्सन तुफान पावसाळ्यांच्या रात्री कंदीलाच्या मंद प्रकाशात 'फॉरेस्ट'आणि 'गार्डन रिपोर्ट' लिहित असे तो गिब्सनचा बंग्लो तसेच ज्या घोड्यावर बसून तो दररोज आठ मैल रपेट मारून 'फॉरेस्ट इन्सपेक्शन' करत असे त्या घोड्याचा तबेला आजही सुस्थितीत दिसून येतो. गिब्सनने दोनशे वर्षांपूर्वी लावलेला दुर्मिळ महोगनी वृक्ष आजही दिमाखात उभा आहे. गिब्सन आणि जे.इ. स्टॉक्सने बांधलेल्या छोट्या धरणाच्या अस्तित्वखुणा पाहायला मिळतात

         मुळात इ. स. १८०० मध्ये स्कॉटलंड मध्ये जन्मलेली व्यक्ती भारतातील जुन्नर तालुक्यातील  नावाच्या या आडवळणावरील गावात पोहोचलीच कशी ? तिथं या व्यक्तीने त्या काळी'बॉटनिकल गार्डन' कशी उभारली असेल ? ही व्यक्ती स्कॉटलंड मध्ये जन्मूनही स्थानिकांशी मराठीतून संवाद साधायची किमया कशी साध्य करू शकली ? आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून गावकऱ्यांना निःशुल्क वैद्यकीय सेवा कशी पुरवली असेल ? साबुदाणा, बटाटा, ऊस अशा पिकांवर प्रयोग करून इथल्या शेतकऱ्यांना त्याचा परिचय कसा करुन दिला ? या व्यक्तीत अशी कोणती जादू होती की रात्री बंगल्यावर दरोडा पडला असता आजूबाजूच्या गावातील सगळे रहिवाशी त्याच्या मदतीला धावून आले ? छत्रपती शिवराय आणि कान्होजी आंग्रेंच्या वननितीचा अभ्यास या व्यक्तिला का करावासा वाटला असेल ? असे अनेक प्रश्न सहज कुणालाही पडू शकतात. आणि त्यातूनच उलगडत जातो डॉ. अलेक्झांडर गिब्सनचा नाट्यमय जीवन प्रवास....

        अलेक्झांडरचा जन्म २४ ऑक्टोबर १८०० साली लॉरेन्सर्क ( स्कॉटलंड ) येथे झाला. लहानपणीच अलेक्झांडर वडीलांकडून धार्मिक सहिष्णुता, निसर्गप्रेम आणि प्रगतीशील शेतीचे कौशल्य शिकला. माँट्रोज अकॅडमीत अँबरडीन  मधल्या मँरिशस कॉलेजमध्ये लँटिन, ग्रीक आणि प्राकृतिक इतिहास यांचं शिक्षण घेतलं.एडिंबरा इथल्या विद्यापीठात अलेक्झांडरने 'मटेरिया मेडिका' शरीरशास्र व वनस्पतीशास्र यांचं अध्ययन केलं.

      इ.स.१८२५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं ब्रह्मदेशात डॉ. गिब्सन यांची ' फ्लॅग सर्जन' म्हणून नियुक्त केली. उत्कृष्ट सेवेसाठी गिब्सन यांना ब्रह्मदेशात 'अवा पदक' देण्यात आले. इ.स.१८२७ मध्ये 'ट्रूप्स ऑफ बाँबे हॉर्स, आर्टिलरी' या घोडदळासाठी 'सहायक शल्यचिकित्सक' म्हणून नेमणूक झाल्यानं डॉ.गिब्सन ब्रह्मदेशातून मुंबईत माटुंगा इथे आले. इ.स.१८३० मध्ये गुजरात,कोकण आणि दख्खन इथे लसीकरणाच्या कामासाठी त्यांची नियुक्ती झाली. मराठी, हिंदी, गुजरातीत ते बोलू शकत. भिल्ल आणि अन्य आदिवासी समाजाबरोबर मोहाच्या लागवडीसंबंधी डॉ.गिब्सन यांनी उत्तम संवाद साधला.

          ईस्ट इंडिया कंपनीला जहाज बांधणीसाठी लागणाऱ्या लाकूड पुरवठ्यात टंचाई निर्माण झाल्यानं इ.स.१८४० मध्ये मुंबई सरकारनं पश्चिम घाटातल्या उत्तर अरण्यांचं सर्वेक्षण करण्याचा आदेश डॉ. गिब्सन यांना दिला. इ.स.१८४० ते १८४४ या काळात घोडेस्वारी करत डॉ.गिब्सन यांनी हे सर्वेक्षण पार पाडले. मलेरिया, विषारी वायू यांचा धोका टाळण्यासाठी गिब्सन पहाटे तीन वाजता उठून आठ मैल अंतर विजेरीच्या प्रकाशात पायी चालत असे. चार मैल घोड्याच्या पाठीवर तर सकाळी आठ वाजेपर्यंत चार मैल अंतर डोलीतून कापत असे. शंभर दिवस ८०० मैलांचा प्रवास करत मुंबई ते दक्षिण कर्नाटक पर्यंतचे दौरे त्यांनी पार पाडले. त्यावेळी मोठ्या प्रमाणातली वृक्षतोड आणि उजाड व नापिक जमीनींचे पट्टे डॉ. गिब्सन यांना आढळून आले. कोळसा, कृषी साधनं, चाकं, नागरी कामं, खांब, दारुगोळा वाहून न्यायच्या गाड्या, बंदुका, इंधन, इ. गोष्टींसाठी विशाल अरण्य नष्ट झाली होती. इ.स. १८४२ मध्ये त्यांनी नोंद करून ठेवली होती की, ' स्थानिक लोक वृक्षतोड करण्याच्या बाबतीत तयार आहेत पण वृक्षारोपणाच्या बाबतीत अजिबात जागरुक नाहीत.' लोकांकडे अरण्याची जबाबदारी सोपवण्याबाबत डॉ. गिब्सन यांनी सरकारला पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आणि अमर्याद वृक्षतोडीवर बंधन येण्याकरीता नियम तयार करण्यावर भर दिला. स्थानिक समाजाचा विश्वास संपादन केला. झाडांच्या अतिरिक्त छाटणीतून लोकांना लाकूड दिलं. लोकसहभाग आणि भागिदारीतून सामाजिक वनीकरणाचा पाया घातला गेला. अरण्यांचं सुयोग्य व्यवस्थापन करण्याची गरज गिब्सनने पहिल्यांदा अधोरेखित केली.

     इ.स.१८३६ मध्ये पुण्यातल्या 'दापोडी उद्याना' त अधिक्षकपदी मुंबईचे राज्यपाल सर रॉबर्ट ग्रँट यांनी डॉ. गिब्सन यांची नियुक्ती केली. दापोडी उद्यान पवना नदीकाठी ९० एकरांवर वसलेलं होतं. गिब्सनने तेथे औषधी वनस्पती आणि पिकांच्या गुणवत्तावाढीवर भर दिला.डॉ. गिब्सन यांनी एका अज्ञात पोर्तुगीज चित्रकाराला दर महिना २० रुपये पगारावर २६ महिन्यांसाठी नेमलं. स्वतः गिब्सन यांनी जातीनं लक्ष घालून दापोडी आणि हिवरे उद्यानातल्या १७३ वनस्पतींची चित्रं त्या चित्रकाराकडून काढून घेतली. ही चित्रे 'दापुरी ड्राँईग्ज' म्हणून प्रसिद्ध आहेत. एडिंबरा येथे ही मूळ चित्रं आजही सुरक्षित आहेत. १७७ वर्षांपूर्वी गिब्सन यांनी स्कॉटलंडला जी कृषिसाधनं पाठवली होती त्यात कुदळ,फावडे,बी पेरण्याचं यंत्र, नांगर,टिकाव,थापी यांचा समावेश होता. जुन्नरहून पाठवलेली बैलगाडी ' नँशनल म्युझिअम ऑफ स्कॉटलंड ' मध्ये ठेवण्यात आली आहे.

        डॉ. गिब्सन यांनी परंपरागत औषधी वनस्पतींवर ४८ च्या वर संशोधन निबंध लिहिले. 'जर्नल ऑफ दि अग्रीकल्चरलअँड हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया' या संशोधन पत्रिकांमध्ये त्यांचं लिखाण प्रसिद्ध झाले होते. आपल्या लिखाणात ते म्हणतात, ' पहाडी जंगलातलं कुजलेलं लाकूड आणि पाचोळा स्वच्छतेसाठी बाजूला केला नाही तर त्यातून प्रचंड प्रमाणात वनस्पतीजन्य खत तयार होतं. खालच्या भागात सुपिकतेचा मोठा परिणाम साधू शकेल असं हे खत पावसाच्या माध्यमातून वाहून नेलं जातं.'  इ.स. १८५२ मधल्या आपल्या फॉरेस्ट रिपोर्ट मध्ये त्यांनी लिहून ठेवलं आहे की, ' जंगलतोडीमुळे ओढे कोरडे होतात; सर्वसाधारण वार्षिक तापमानवाढ होण्यावर, त्याचप्रमाणे वातावरणातली शुष्कता वाढवण्याच्या रुपानं थेट परिणाम होत असतो.'  यातून त्यांची अभ्यासू वृत्ती दिसून येते. स्थानिक तरुणांना शास्रशुद्ध वनस्पतीशास्राच्या अभ्यासासाठी व वनशास्रात रूची निर्माण होण्यासाठी त्यांनी हिवरे येथे एक ग्रंथालय सुरु केले होते. त्याकाळी या ग्रंथालयाचं मूल्य होतं १००० रुपये ! गिब्सन यांनी हर्बेरिअम केलेले जुन्नर परिसरातील जैव विविधतेने नटलेल्या वनस्पतींचे मूळ शास्रीय नमुने आजही वातानुकूलित कक्षात आर.बी.जी क्यू लंडन येथे सुरक्षित ठेवलेले आहेत. 'बॉम्बे फ्लोरा' 'हँडबुक टू दी फारेस्ट ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी' ही महत्वाची दस्तऐवज असलेली पुस्तकंही गिब्सनने लिहिली. इ. स. १८६४ मध्ये गिब्सनने स्कॉटलंडला प्रयाण केले. 

     १६ जानेवारी १८६७ रोजी हिमवादळ सुरु असताना ऑकेनरिऑक ( स्कॉटलंड ) येथे गिब्सन यांनी अखेरचा श्वास घेतला. ऑकेनरिऑक येथे गिब्सन यांनी जाएंट रेडवुड हे महाकाय वृक्ष लावले होते. आपल्या मृत्यूपत्रात गिब्सन यांनी लिहून ठेवले होते : " जो कोणी वृक्ष कापेल त्याचे नाव कायदेशीररित्या माझ्या जमीनजुमल्याच्या वारसा हक्कातून रद्द करण्यात येईल." मृत्यूनंतरही गिब्सनला काळजी होती ती त्याच्या लाडक्या वृक्षांचीच ! 

       माँट्रेज मधल्या श्रद्धांजली सभेत गिब्सनसाठी उच्चारलेले शब्द हेच त्यांच्या कार्याचे फलीत होते.

ते शब्द होते : 

'' दिलदार आणि महनीय व्यक्तिमत्वाच्या डॉ. अलेक्झांडर गिब्सन यांनी स्वतःसाठी आरामशीर जीवनशैली कधीच स्वीकारली नाही. परंतु इतरांच्या कल्याणासाठी, सुख सुविधांसाठी प्रयत्न करायला ते नेहमीच तत्पर असत. भारतातील वनसंपत्ती जपण्यासाठी, सुधारण्यासाठी आणि वाढवण्यासाठी त्यांनी आजीवन अथक प्रयत्न केले ! "

Post a Comment

0 Comments