लेखक
सुभाष पुराणिक,
विभागीय वन अधिकारी( सेवा निवृत्त )
साप हा प्राणी पृथ्वी वरील प्राणी जगताच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात निर्माण झालेला एक सरपटणारा जीव आहे. मिळालेल्या जीवाश्मांवरून सापांचे अस्तित्व आपल्या पृथ्वीवर साधारण 10 कोटी वर्षांपूर्वी पासून आहे. सापांचे प्रमुख अन्न हे किटक, लहान प्राणी, लहान पक्षी हे आहे. शेतपीके हे मनुष्य प्राण्याचे मुख्य अन्न आहे. या अन्नधान्या पैकी 20% च्या वर अन्नधान्य पशूपक्षांमुळे नाश होते. यामध्ये उंदीर या प्राण्याचा पहिला क्रमांक लागतो. बहुतांश साप हे उंदीर खात असल्याने साप आपले अन्नधान्य वाचवतो. अशाप्रकारे साप हे शेतकऱ्यांचे मित्र ठरतात.
देव दानवांनी जेव्हा समुद्र मंथन केले तेव्हा वासुकी नावाच्या सापाची दोरी केली होती. यजूर्वेदामध्ये नागस्तुती करणारे मंत्र आहेत. अथर्व वेदामध्ये सर्पवेद हा उपवेद आहे. व्दापारयुगात श्रीकृष्णाने कालीया सापाचे मर्दन करून स्थानिक लोकांना त्रासापासून मुक्ती दिली होती. तक्षक सापाची गोष्ट सर्वांना माहिती आहे. शेषशायी भगवान विष्णू, भगवान महादेवाने आपल्या गळ्याभोवती ठेवलेला नाग याच्या प्रतिमा आपल्याला अनेक लेण्यांतील कोरीव कामातून दिसून येतात. सापांच्या प्रतिमा अनेक मंदिरात पूजेला आहेत. अशा प्रकारे अनंत काळापासून आपल्याकडे साप या प्राण्याला पूजनीय मानले गेले आहे. भारतातच नाही तर अगदी चीन, जपान, ग्रीस मध्ये साप हे देवांचे प्रतिक समजतात. अमेरिकेत काही जाती सापांना पूजतात देखील.
आजच्या दिवशी शेतकऱ्याने जमीन नांगरताना सापाच्या पिल्लांना मारल्याने नंतर घडलेल्या बदल्याच्या गोष्टी मुळे सापांची पूजा करण्याची प्रथा पडल्याची कहाणी चातुर्मासाच्या पुस्तकात आहे. अशाप्रकारे जैवविविधतेच्या साखळीतील साप हा प्राणी आपल्याला उपयोगी असून त्याचे रक्षण करणे आपले कर्तव्य बनते.
साप हा थंड रक्ताचा प्राणी असल्याने वातावरणातील तापमानाप्रमाणे त्याच्या शरीराचे तापमान बदलते. त्यामुळे थंडीत कमी हालचाली साठी साप आडोशाला वेटोळे मारून बसतात आणि कमीतकमी हालचाल करतात. वाढीच्या काळात साप आपल्या अंगावरची कात टाकून पुन्हा चकचकीत शरीर मिळवतात. संपूर्ण जगात सापांच्या एकूण 2700 जाती आढळतात तर भारतात जवळजवळ 300 जातींचे साप मिळून आलेले आहेत. सर्वसामान्यांना सापांबद्दल भिती असते कारण सापाचा दंश म्हणजे म्रूत्यू.... अशी चूकीची समजूत. प्रत्यक्षात आपल्याकडे मिळणार्या सापांपैकी नाग, घोणस, फुरसं आणि मण्यार हे साप विषारी असून यांच्या दंशावर प्रतिविष टोचून उपचार न झाल्यास माणसाचे मरण ठरलेले असते. चूकीच्या कल्पनेने आणि चूकीच्या घरगुती उपचारांमुळे भारतात जवळपास 10000 च्यावर सर्पदंशाने म्रूत्यू होतात. आजच्या विज्ञान वादी सुधारलेल्या जगात हे घडतय ही शरमेची बाब आहे.
पण बहुतांश साप हे बिनविषारी असल्याचे आपल्या लक्षात आले असेलच. आता लगेचच आपण साप वाचवा म्हणून मोहिम हाती घ्याल. साप पकडून लोकांना दाखवायला सुरवात कराल. तर ती क्रूती वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार बेकायदेशीर असून त्यापायी शिक्षा होऊ शकते हे लक्षात घ्यावे.
सापाला बाह्यकान नसतात. बर्याचशा संवेदना या कंपनांद्वारे समजतात. तसेच वळवळणारी आणि तोंडातून आतबाहेर होणारी जीभ हवेतील गंधकण घेऊन जेव्हा तोंडात जाते तेव्हा टाळूच्या ठिकाणी असलेल्या जेकबसन ऑर्गन मध्ये त्याचे प्रूथःकरण होऊन नैसर्गिक क्रियांची जशी खाद्य, परलिंगी बांधव वगैरेची माहिती होते. या अशा शारीरिक गुणधर्मामुळे सापांबद्दल अंधश्रद्धा वाढलेल्या आणि जोपासलेल्या आढळतात.
1.साप हा सुळकन वळवळत नाहीसा होतो. त्यामुळे त्याच्या बद्दल सहज माहिती समजत नाही. त्यातून गैरसमज होतात.
2.सापाच्या डोळ्यांना पापण्या नसतात. त्यामुळे तो एकटक बघतोय असे वाटते.
3.साप मारल्यावर जर त्याचे लैंगिक अवयव चिरडले गेले तर तो वास ईतरत्र पसरतो. गंधकण हेच संपर्क माध्यम असल्याने तसे गंधकण प्राप्त झाल्यावर भिन्नलिंगी प्राणी त्या वासाच्या मागावर येतो. असे ईतरही साप येऊ शकतात आणि आपण म्हणतो की एकाला मारले की सात साप येतात.
4.शेतात किंवा ईतरत्र आपल्याला एखादा साप दिसला, आपल्याकडून पळवला गेला, स्पर्श झाला आणि आपण घराकडे आल्यावर आपल्याला तसा साप दिसला तर आपण म्हणतो की साप डूक धरून पाठून आला. प्रत्यक्षात बाहेर दिसलेल्या सापाचे गंधकण आपण वाहून आणल्यावर त्याच्या ईतर भाईबंद ना ते कळून ते तुमच्या कडे आले. यात गैर नाही. पण तुम्हाला बाहेर दिसलेला तो साप नसणार ही 99% विश्वास ठेवायची बाब आहे.
5.सापाचे भक्ष किटक वगैरे असल्याने तो दूध पित नाही. मात्र उन्हाळ्यात पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेले साप आढळतात.
6.प्रतिकारासाठी कोणतेच साधन निसर्गाने दिले नसल्याने आपले डोके वाचवण्यासाठी धडपड असते. त्यामुळे पुढे दिसणारी वस्तू आपल्या डोक्यावर येऊ नये किंवा थेट प्रतिकार करता यावा यासाठी साप आपले डोके, नाग आपली फडा हलवत असतो. त्यामुळे तो डोलतोय असे वाटते. लॉनटेनिस पटू पुढील चेंडू येण्यापूर्वी किंवा क्रिकेटपटू चेंडू येण्यापूर्वी असेच हलताना आपल्याला दिसतात.
......अशा या सापाची रहाण्याची जागा ही अंधाराची, जास्त थंड असते. त्यामुळे आपल्याला सापाशी सामना करावा लागू नये म्हणून घराजवळ कचरा, अडगळ जमा होऊ देऊ नये. उरलेल्या अन्नाची खड्यात विल्हेवाट लावावी. जर ते उघड्यावर टाकले तर ते खाण्यासाठी उंदीर येणार आणि त्यापाठी साप येणार हे ठरलेले. आम्ही जेवढे साप जंगलात बघितले आहेत त्याच्या चौपट गावाजवळ तर त्याच्या दहापट शहरात बघितले आहेत. सापांचे विष हे त्यांना आवश्यक असलेले पाचक रसायन असते. पण ते आपल्याला जीवघेणे ठरते. साप चावला, दंश झाला तर व्यक्ती ला धीर द्यावा, झोप येऊ न देणे, दंशाच्या अवयवाला आवळपट्टी बांधणे, हालचाल कमी करणे हे पाळून नजिकच्या वैद्यकीय उपचार केंद्रात नेणे हा एकच खात्री लायक सिध्द झालेला मार्ग आहे. आजवर कोणत्याही झाडपाल्याच्या अगर मंत्राच्या सहाय्याने विषारी सापाच्या दंशातून कोणी वाचलेला नाही. सापाचे विष प्रतिविष बनविणे, संधीवात, ह्रदयरोग यावर औषध बनवण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे त्याची मागणी भरपूर आहे. या एका शब्दात आपल्याला पुढचे कळले असेलच. त्यामुळे सर्पविषाची तस्करी फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. आणि होय आपल्या सारख्या सुशिक्षित आणि समजूतदार लोकांच्या माध्यमातून हे चालते असे म्हटल्यास वावगे वाटू नये.
आपल्याकडे आढळणाऱ्या सापांबद्दल काही स्पष्ट लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे. त्यासाठी सापाला पकडून वरखाली ताणून बघायला नको.
1.गोड्या पाण्यातील साप हे बिनविषारी असतात तर खार्या पाण्यातील साप हे विषारी असतात.
2.लांब लचक असलेले साप हे बिनविषारी असतात. अपवाद किंगकोब्रा.
3.बारीक, निमूळती शेपटी असलेले साप हे बिनविषारी असतात तर थोटकी शेपटी असणारे साप विषारी असतात. अपवाद मांडूळ.
4.पोटावर संपूर्ण आडवे खवले असणारे साप बिनविषारी असतात. अपवाद नाग.
5.जहाल विषारी मण्यार बहुतांश वेळा रात्री, बेरात्री फिरते. दिवसा क्वचितच दिसते.
6.आपणास घराजवळ जर सापाची कात मिळाली तर त्याचे निरिक्षण करा. मोठी असून पोटावर आडवे खवले असल्यास ती धामण किंवा नाग याची असू शकते. पण नागाचे पोह्यासारखे खवले लगेच लक्षात येतात. लहान कात मिळाली आणि पाठीवर मध्ये असलेला खवला ईतर खवल्यांपेक्षा दुप्पट ते तिप्पट मोठा असेल तर ती कात मण्यारीची असेल. यारून आपल्याला आजूबाजूला कोणकोणते साप वावरतात आणि काय काळजी घ्यायला हवी ते समजून येते.
निसर्गाचा हा निर्मित ठेवा वाचविणे हे आपले महत्त्वाचे कर्तव्य ठरते. आपणास खरोखरच साप वाचवायचे असतील तर सर्वसामान्य ज्ञानाचा वापर असल्यास जरूर करावा. गावात, शेतशिवारात साप दिसला तर फक्त शांत राहिल्यास साप निघून जातो. घरांमध्ये साप आल्यास दरवाजे खिडक्या उघडून टाकाव्यात आणि सापाला खडबडाट करून हूसकून लावावे. जर ते भितीमुळे शक्य नसल्यास गप्प राहून साप जायची वाट बघावी. शहरातील फ्लॅट मध्ये, लोकांच्या वस्तीत मध्ये आल्यास आणि ईतर लोक तयार नसल्यासच साप पकडण्याचे काम करावे.
सध्या सोशल मिडीयावर, पॉडकास्ट, रील, ईंस्टा, फेबू यावरील शायनिंग साठी सापांना पकडणे हा ईव्हेंट होत चाललाय. सापांचे हाल होऊ नयेत म्हणून गारूडी लोकांना बंदी घालून साप पकडणे, पाळणे बंद केलय. पण प्रत्यक्षात साप पकडायची गरज आहे का ते कोणी पहात नाही. पकडलेला साप प्रत्यक्षात सोडला जातोय का ते पाहिले जात नाही. आजवर असे अनेक साप पकडणारे साप बाळगताना, विक्री करताना, विष चोरून विकताना पकडले गेलेत. त्यांच्या घरात लपवून ठेवलेले साप चावल्याने ते स्वतः किंवा कुटुंबातील कोणीतरी दूर्दैवाने मेलेत. ....यांना साप पकडायला आपणच बोलावतो हे विसरू नये. मी एक सर्पप्रदर्शन जप्त केल्यावर त्या गरीब ईसमाला सोडवायला कोर्टात बरेच पांढरपेशे, उद्योजक आले होते. काही काळानंतर त्याच आरोपीला सर्पविष बाळगल्यामुळे पोलिसांनी पकडले होते. गेल्या वीस वर्षांत त्याला तीनचार वेळा पकडले आहे. साप पकडायची काठी भारतात मिळत नव्हती त्या काळात ती सिंधुदुर्ग मध्ये काही लोक वापरत होते. त्यांच्या परिस्थिती नुसार ते विदेशी वस्तू खरेदी करू शकत नव्हते. मग ती काठी त्यांना कोणी दिली❓आजही साप पकडून त्याचे रक्त वगैरे काढून दूर्मिळ साप मिळाला वनखात्याकडे दिला वगैरे सोपस्कार केले जातात. साप स्वतः त्याच्यावर काय अत्याचार झाले ते सांगू शकत नाही. लोकशाहीत पुराव्याशिवाय काही चालत नाही. असे आहे. सिंधुदुर्ग मध्ये सापाला वाचवणे वगैरे वगैरे करून पोटपूजा करणारे आणि सतत वनखात्याला शिव्याशाप देणारे लोकांच्या मनात साप वाचवणारे देवदूत ठरल्यावर ...पुढे किंगकोब्रा सापाच्या तस्करीत आतमध्ये गेले अशी पुढ्यातील उदाहरणे आहेत.
सापांची कातडी घड्याळाचे पट्टे, कमरेचे पट्टे , ब्यागा, बूट तयार करण्यासाठी वापरले जातात. WLCCB मार्फत सापांची कातडी हजारो च्या संख्येने जी विमानतळावर पकडली जातात ती कुठेतरी काढली जातात म्हणूनच. तरी याला आपण कारणीभूत ठरत नाही ना हा विचार सुशिक्षित लोकांनी करायला हवा.
अशावेळी सोमेश्वर अभयारण्यात ( कर्नाटक ) घडलेली घटना लक्षात रहाणारी आहे. किंगकोब्रा हा साप ईतर साप खाऊन जगतो. ईतर साप उंदीर खायला गावात घराजवळ येतात. जर त्या सापांसाठी किंगकोब्रा घराजवळ आला आणि बीळात तोंड घातलेल्या स्थितीत दिसला तर लोक त्यावर पाळत ठेवतात. त्यांना समजते कि किंगकोब्रा बीळात साप पकडून गिळतोय. ही प्रक्रिया दोनचार तास चालते. सापाला पूर्ण गिळल्यानंतर किंगकोब्रा बाहेर पडून निघून जातो. गाववाले तेथे कोणालाही येऊ देत नाहीत. जर साप घराच्या आत आहे आणि सहज बाहेर जाणार नाही याची खात्री झाली तरच पकडण्यासाठी बोलावले जाते. अन्यथा नाही. आज पैसा आहे म्हणून क्यामेरा घेतलेले, कोणत्याही परिस्थितीत फोटोसाठी कायपण करायला तयार असणारे जगात कमी नाहीत. पैसा मिळवण्यासाठी बेरोजगार, प्रसिद्धी साठी सुशिक्षित, प्रतिष्ठेसाठी पैसेवाले अशा त्रांगड्यात निसर्ग वाचवायचाय आणि त्याचे घटक.....आज ...साप🐍.....बघा आपल्याला काय शक्य होते ते. ः
ःसुभाष पुराणिक,
विभागीय वन अधिकारी( निव्रूत्त )
0 Comments