MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

बहेलिया शिकारी कोण आहेत ?

बहेलिया शिकारी कोण आहेत ? 

वाघांच्या शिकारीसाठी बहेलिया कसे सापळे वापरतात? 

 मध्य प्रदेशातील कटनी येथील ही जमात जंगलातील लहान वन्यप्राण्यांच्या नाही तर वाघासारख्या मोठ्या वन्यप्राण्यांच्या शिकारी सराईतपणे करतात. त्यांना ‘कटनी गँग’ या नावानेदेखील ओळखले जाते. शिकारीची त्यांची पद्धती वेगळी असून त्यासाठी ते वेगळा सापळा वापरतात. या शिकारी जमातीतील संघटित टोळ्या सापळ्यांसाठी स्टीलचा वापर करतात. मानवी जबड्याच्या आकाराचे सापळे तयार करून ते वाघांच्या शिकारीसाठी वापरतात. यांनी तयार केलेल्या स्टील तसेच लोखंडाच्या सापळ्यात वाघ अडकल्यास क्वचितच ते जिवंत राहतात. वाघांची त्यांच्या शरीराच्या अवयवांसाठी आणि कातडीसाठी शिकार करणे ही बहेलिया शिकारीच्या संघटित टोळ्यांची कार्यपद्धती आहे.ज्या लोखंडी सापळ्यांचा वापर करतात त्याला बहेली सापळा म्हणतात

कसा आहे हा ‘बहेली’ सापळा?

 ‘बहेली’ सापळा हा साखळी व पूर्णपणे लोखंडापासून बनवलेला असतो. दीड ते दोन फूट साखळीला पुढे चिमटा तयार करण्यात आलेला असतो. वन्यप्राण्याचा पाय पडला की चिमटा सुटून त्यामध्ये प्राण्याचा पाय अडकतो. पाय सोडविण्यासाठी प्राणी जेवढी धडपड करेल तेवढा तो चिमटा पायात रुतून घट्ट होत जातो.

 बहेलियांचा महाराष्ट्रातील वाघांच्या शिकारीचा इतिहास काय? 



 २०१३ ते २०१६ या कालावधीत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात एकापाठोपाठ एक शिकारी उघडकीस आल्या. मेळघाटातून हे शिकारसत्र उघडकीस आले आणि तेव्हा महाराष्ट्राला या शिकारी जमातीची ओळख झाली. प्रामुख्याने विदर्भात त्यांनी वेगवेगळ्या नावांनी, वेगवेगळ्या वेशभूषा करून ठिकठिकाणी तळ ठोकले, पण त्याची साधी चाहूलही वनखात्याला लागली नाही. जेव्हा कळले तेव्हा मोठ्या संख्येने वाघांची शिकार झाली होती. स्थानिकांना हाताशी धरून त्यांनी या शिकारी केल्या. २०१३ ते २०१६ या कालावधीत किती वाघांच्या शिकारी? २०१३ साली बहेलियांची मेळघाट परिसरातील घटांग येथून वाघाची पहिली शिकार उघडकीस आली. त्यानंतर शिकारीचे सत्र उघडकीस येत गेले. मेळघाटात सर्वाधिक शिकारी त्यांनी केल्या. तर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, उमरेड-करांडला अभयारण्य, बोर व्याघ्रप्रकल्प यासह प्रादेशिक विभागातूनही वाघांची शिकार केली. अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यासह विदर्भातून सुमारे ४० ते ५० वाघ त्यांनी मारले. या शिकार प्रकरणात जवळजवळ १५० बहेलिया शिकाऱ्यांना अटक करण्यात आली.

 बहेलिया शिकाऱ्यांची शिकारीची पद्धत काय?


 शिकार करण्याआधी ते व्याघांचा संचार असणाऱ्या ठिकाणांची टेहळणी (रेकी) करतात. शिकारीच्या आसपासच्या परिसरात तळ ठोकून वैदू असल्याचा बनाव करून गावकऱ्यांचा विश्वास जिंकतात. त्यांचे राहणे एकीकडे आणि शिकारीचे साहित्य दूसरीकडे असते. एखाद्या झाडावर शिकारीचे साहित्य लपवून ठेवण्याला ते प्राधान्य देतात. वाघ पाणवठ्यावर कधी येतो, त्यांचा भ्रमणमार्ग काय याचा अभ्यास करतात. ज्या दिवशी शिकार करायची, त्या दिवशी वाघाचा एक भ्रमणमार्ग सुरू ठेवून इतर सर्व बंद करतात आणि पाणवठ्याजवळ जमिनीत सापळा लावतात. या सापळ्यावर वाघाचा पाय पडला की तो घट्ट अडकतो आणि मग बहेलिया वाघाच्या जबड्यात ओंडका फेकतात. यामुळे वाघाचा श्वास गुदमरतो आणि तो काही क्षणात मृत्युमुखी पडतो.

 बहेलिया’ आणि ‘बावरिया’ यांच्यातील फरक काय?

 महाराष्ट्रात व प्रामुख्याने विदर्भात २०१३ ते २०१६ या कालावधीत मध्यप्रदेशातील कटनी येथील ‘बहेलिया’ या शिकारी टोळ्यांनी वाघांच्या शिकारी केल्या. तर कातडी, अवयवांच्या तस्करीची जबाबदारी ‘बावरिया’ या टोळ्यांनी पार पाडली. आता पंजाब, हरियाणा, राजस्थान येथील ‘बावरिया’ हा समूह तस्करी न करता थेट शिकारीत उतरला आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील जंगलाबाहेरच्या मोठ्या गावात त्यांनी बस्तान बसवले आहे. स्थानिक लोकांच्या ते संपर्कात असल्याची माहिती आहे. ‘बहेलिया’ ही मध्य प्रदेशातील कटनी येथील तर ‘बावरिया’ ही पंजाब, हरियाणा, राजस्थान येथील शिकारी जमात आहे 

 वन विभागाने स्थानिकांना डावलणे महागात पडणार का? 


वनविभाग आणि स्थानिक गावकरी यांच्यातील अंतर आजतागायत कमी झाले नाही. मानव-वन्यजीव संघर्षादरम्यान जनावरांचा, माणसांचा बळी जात असल्याने गावकरी खात्यावर चिडून असतात. त्यातही खाते पैश्याच्या स्वरुपात मोबदला देऊन मोकळे होऊन जाते, पण गावकऱ्यांना त्यांनी कधीच विश्वासात घेतलेले नाही. याचाच फायदा घेत बहेलिया, बावरिया यासारख्या शिकारी टोळ्या त्यांना आपल्यात सामावून घेतात. वनखात्यावरील राग व्यक्त करण्यासाठी मग ते वाघांच्या शिकारीसाठी या टोळ्यांना मदत करतात. वास्तविक या गावकऱ्यांना वनखात्याने विश्वासात घेतले तर शिकारी रोखल्या जाऊ शकतात, पण तसेच होत नाही. आताही केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने ‘अलर्ट’ दिल्यानंतर गावातील लोकांसोबत बैठका घेऊन स्थानिकांना सोबत घेतले, तरच या शिकारी रोखता येतील.

Post a Comment

0 Comments