MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) (सुधारणा) अध्यादेश, 2024

महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) (सुधारणा) अध्यादेश, 2024

महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 7, सन 2024
महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) अधिनियम, 1964 यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.


1. संक्षिप्त नाव व प्रारंभ.

(1) या अध्यादेशास, “महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) (सुधारणा) अध्यादेश, 2024”, असे म्हणावे.

(2) तो, तात्काळ अंमलात येईल.


2. सन 1964 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 34 याच्या कलम 2 ची सुधारणा.

महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) अधिनियम, 1964 (यात यापुढे ज्याचा निर्देश “मुख्य अधिनियम” असा केला आहे), याच्या कलम 2 मध्ये,—

(1)

खंड (इ) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :—

“(इ) “झाड तोडणे” यामध्ये, झाड मारून टाकण्यासाठी किंवा त्याचा नाश करण्यासाठी झाड जाळणे किंवा कापणे किंवा छाटणे किंवा बुंध्याभोवतीची साल कोरणे (गर्डलिंग) किंवा झाडाची साल काढणे यांचा समावेश होतो;”

(2)

खंड (ग) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :—

“(ग) “नागरी क्षेत्र” याचा अर्थ, ज्या महानगरपालिका क्षेत्रासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम किंवा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम या अन्वये महानगरपालिका गठित करण्यात आली आहे असे महानगरपालिका क्षेत्र, किंवा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 याच्या कलम 2 च्या खंड (24) च्या अर्थांतर्गत असलेले असे नगरपालिका क्षेत्र, असा आहे, आणि त्यामध्ये, ज्या क्षेत्रासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 याच्या कलम 40 अन्वये विशेष नगररचना प्राधिकरणाची रचना किंवा नेमणूक करण्यात आली आहे अशा अधिसूचित क्षेत्राचा किंवा ज्या नवीन नगरासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 याच्या कलम 113 अन्वये विकास प्राधिकरणाची रचना करण्यात आली आहे अशा नवीन नगराची जागा म्हणून निर्दिष्ट करण्यात आलेल्या क्षेत्राचा समावेश होतो;”.


3. सन 1964 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 34 याच्या कलम 4 ची सुधारणा.

मुख्य अधिनियमाच्या कलम 4 मधील, “तो, कलम 3 अन्वये शक्ती प्रदान केलेल्या” या मजकुराने सुरू होणाऱ्या आणि “एक हजार रुपयांहून अधिक नसेल इतक्या दंडाच्या शिक्षेस पात्र होईल,” या मजकुराने संपणाऱ्या मजकुराऐवजी, पुढील मजकूर दाखल करण्यात येईल :—

“तो, पन्नास हजार रुपये इतक्या दंडास पात्र असेल. कलम 3 अन्वये अधिकार प्रदान केलेला वृक्ष अधिकारी, चौकशी केल्यानंतर आणि अशा व्यक्तीस बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर, दंड लादील;”.

------------------------------ 

महत्त्वाची टीप

महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) (सुधारणा) अध्यादेश, 2024 हा महाराष्ट्र शासन राजपत्रात 6 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. या अध्यादेशाद्वारे महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) अधिनियम, 1964 मध्ये सुधारणा करण्यात आली होती.

त्यानंतर, सदर अध्यादेशातील सुधारणा कायमस्वरूपी कायद्यात समाविष्ट करण्याच्या उद्देशाने “महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) (सुधारणा) विधेयक, 2024” मांडण्यात आले. तथापि, सदर विधेयक नंतर महाराष्ट्र विधानमंडळातून मागे घेण्यात आले.

Post a Comment

0 Comments