महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत सुधारणा अध्यादेश 2024 च्या तरतुदी 11 जानेवारी 2025 नंतर लागू नाहीत; शासनाचे परिपत्रक जारी
महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) (सुधारणा) अध्यादेश, 2024 हा राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर न झाल्यामुळे दिनांक 11 जानेवारी 2025 नंतर लागू राहणार नसल्याचे महसूल व वन विभागाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात शासनाने दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी परिपत्रक जारी केले आहे.
महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) अधिनियम, 1964 मध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) (सुधारणा) अध्यादेश, 2024 हा अध्यादेश जारी केला होता. सदर अध्यादेश महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.
मात्र, अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेली विधिमंडळाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. संबंधित विधेयक दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी विधानसभेत मांडण्यात आले होते; परंतु राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे अध्यादेशातील तरतुदी दिनांक 11 जानेवारी 2025 नंतर लागू राहणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
वन अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे निर्देश
शासनाच्या दिनांक 17 जानेवारी 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार, सदर बाब सर्व वृक्ष अधिकारी तथा वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यामुळे झाडे तोडण्यासंबंधीच्या प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींच्या आधारे कार्यवाही करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) (सुधारणा) अध्यादेश, (माह. आदेश VII चा 2024) महाराष्ट्राच्या राज्यपालांनी 06.09.2024 रोजी जारी केलेल्या आदेशाबाबत.
.jpg)
0 Comments