वन्यजीवांची तस्करी एक गंभीर समस्या असून विदर्भात ती वाढत चालली आहे. वाघ आणि बिबट्याच्या अवयवांच्या तस्करीसह खवले मांजरांच्या अवयवांची तस्करी चिंताजनक आहे. या प्राण्यांची संख्या आधीच धोक्यात असताना त्यांना शिकार आणि तस्करीचा विळखा बसल्याचे ‘आंतरराष्ट्रीय जर्नल ऑफ क्रिमिनल, कॉमन आणि स्टॅट्युटरी लॉ’ या शोधपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.
विदर्भात वन्यजीव तस्करी, शिकार करण्याच्या पद्धती आणि कायद्याची अंमलबजावणी धोरणे यावरील विभागीय वनाधिकारी नरेंद्र चांदेवार यांचा अभ्यास ‘आंतरराष्ट्रीय जर्नल ऑफ क्रिमिनल, कॉमन आणि स्टॅट्युटरी लॉ’ या शोधपत्रिकेत नुकताच प्रसिद्ध झाला. जुलै २०२१ ते जुलै २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीतील वन्यजीव गुन्ह्यांच्या तपासाचा हा अभ्यास आहे. या कालावधीत ३३ सापळे रचून १६३ आरोपींना अटक केली आहे
वन्यजीव तस्करी विदर्भात वाढत असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून समोर आला. प्रामुख्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षित जीवंत वन्यप्राण्यांची तस्करी चिंताजनक आहे. त्यामुळे सरकारने वन्यजीव संरक्षणाबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी आणि धोक्यात असलेल्या प्रजातींसाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलावीत, अशीही शिफारस या अभ्यासात करण्यात आली आहे.
विदर्भात वाघ, बिबट्या, पँगोलिन आणि रेड सँडबोआ यासारख्या प्रतिष्ठीत प्रजातींना शिकारी लक्ष्य करतात. त्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी आहे. वन्यजीवांच्या अवैध व्यापारामुळे विदर्भातील जैवविविधता आणि परिसंस्थेला धोका निर्माण झाल्याचा निष्कर्ष देखील या अभ्यासात आहे.
वन्यजीवांची तस्करी, शिकार यासह वन्यजीव गुन्हे ही एक मोठी समस्या आहे. महाराष्ट्र आणि विशेषत: विदर्भात अशा बेकायदेशीर कारवाया वाढल्या आहेत.समृद्ध जैवविविधता, वैविध्यपूर्ण परिसंस्थेसाठी ओळखला जाणारा विदर्भ वन्यजीव, जंगले आणि आंतरराज्यीय सीमांच्या जवळ असल्यामुळे वन्यजीव गुन्ह्याचे मुख केंद्र बनले आहे.
0 Comments