MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

मानव - बिबट संघर्षाच्या अनुषंगाने जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील 233 अतिसंवेदनशिल गावांना "संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र" म्हणून घोषित करण्याबाबत ..

मानव - बिबट संघर्षाच्या अनुषंगाने जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील 233 अतिसंवेदनशिल गावांना "संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र" म्हणून घोषित करण्याबाबत ..






विषय :- मानव - बिबट संघर्षाच्या अनुषंगाने जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील 233 अतिसंवेदनशिल गावांना "संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र" म्हणून घोषित करण्याबाबत ..

आदेश,
ज्याअर्थी, वाचले क्र. 2 अन्वये पुणे जिल्हयातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरुर या चार तालुक्यांचा जुन्नर वनविभागामध्ये समावेश असून या वनविभागाचे क्षेत्र व्यवस्थापनाच्या दृष्टीने अनुक्रमे जुन्नर, ओतूर, मंचर, घोडेगाव, खेड, चाकण व शिरुर या सात वनपरिक्षेत्रामध्ये विभागलेले आहे. जुन्नर वनविभागाचे बहुतांश क्षेत्र डोंगराळ असून यामध्ये पाटबंधारे विभागाचे मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प आहेत. यात प्रामुख्याने घोड व कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे, माणिकडोह, पिंपळगांव जोगे, वडज, चिल्हेवाडी, चासकमान असे मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्प असल्याने सिंचन सुविधेत वाढ झालेली आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊस, केळी, द्राक्ष, डाळींब अशी दिर्घकालीन बागायती पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहेत. या दिर्घकालीन पिकांमध्ये बिबट्यांना लपण्यासाठी उत्तम निवारा, पाण्याची मुबलक उपलब्धता, तसेच शेतीव्यवसायामुळे मानवाचे त्यांचे पाळीव प्राण्यांसह शेतातील रहिवासांमध्ये झालेली वाढ या मुळे पाळीव प्राणी भक्ष्य म्हणुन सहज उपलब्ध होत असल्याने बिबट या वन्यप्राण्यांचा अधिवास अशा बागायती क्षेत्रातच निर्माण झालेला आहे. बिबटयांचे वास्तव्य हे प्रामुख्याने ऊस शेतीत आहे. या प्रकरणी गेल्या 23 वर्षापासुन या वनविभागात मानव बिबट संघर्षामध्ये वाढ होत आहे.
आणि ज्याअर्थी, भारतीय वन्यजीव संस्थान, डेहराडुन या संस्थेमार्फत जुन्नर वनविभागाच्या हद्दीत करण्यात आलेल्या अभ्यासाअंती सदर क्षेत्रात बिबट वन्यप्राण्याच्या संख्येची घनता प्रति 100 चौ.कि.मी. मध्ये 6 ते 7 बिबटे इतकी आढळून आली आहे. तसेच बिबट्यांचे मानवा वरील, पशुधनावरील हल्ले पाहता जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरुर या तालुक्यांमध्ये बिबट्यांची एकुण संख्या अंदाजे 400 ते 450 असण्याची शक्यता आहे. जुन्नर वनविभागात मागील 5 वर्षात बिबट वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकूण 40 गंभीर जखमी व 16 मृत्युच्या घटना घडलेल्या आहे. सदर ठिकाणी जनक्षोभ उसळला असून मानवी जीवन धोक्यात आलेले आहे. स्थानिक लोकांचा उद्रेक झाला असुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच बिबट्याचा मानवावरील हल्ला होण्याच्या घटनेत वाढ झाली असुन सदरचे क्षेत्र हे मानव-बिबट संघर्षाचे आपत्तीक्षेत्र झालेले आहे असे कळविण्यात आले आहे. बिबट वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व मृत्युच्या घटनेची व्याप्ती लक्षात घेता सदर क्षेत्र "संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र" घोषीत करणे आवश्यक झाले आहे.
त्याअर्थी, मी डॉ. सुहास दिवसे जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे मागील पाच वर्षातील बिबट वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य जखमी व मृत्यूच्या घडलेल्या घटनेचा तपशिल लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम (30) (2) (iii) व (iv) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराने पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील सोबत जोडलेल्या प्रपत्र (अ) मधील 233 अतिसंवेदनशिल गावांना "संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र" म्हणून घोषित करण्यात येत आहे.

Sd-
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, 
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे
 
प्रति,
उपवनसंरक्षक, जुन्नर वनविभाग, जुन्नर 
2/- यांस "संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र" म्हणून घोषित करण्यात आलेल्या २३३ अतिसंवेदनशिल गावांबाबत उचित कार्यवाही करण्यात यावी.
प्रत-
1) मा. संचालक, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मुंबई यांस माहितीस्तव सविनय सादर
2) मा. विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांस माहितीस्तव सविनय सादर
3) पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामिण यांना पुढील उचित कार्यवाहीसाठी
4) उपविभागीय अधिकारी जुन्नर-आंबेगाव, खेड, पुणे शहर-शिरूर यांना पुढील उचित कार्यवाहीसाठी
5) तहसिलदार जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड यांना पुढील उचित कार्यवाहीसाठी
6) जिल्हा माहिती अधिकारी, पुणे यांना पुढील उचित कार्यवाहीसाठी

Post a Comment

0 Comments