'चंदनाची चोळी' राजेंद्र धोंगडे सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक यांच्या वन सेवेतील एक प्रसंग
राजेंद्र धोंगडे
सेवा निवृत्त सहाय्यक वनसंरक्षक
ऑक्टोबर १९९० साली औरंगाबाद वन वृत्ताचे वनसंरक्षक व्ही बी जोशी यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले व सांगितले की लातूरच्या वनक्षेत्रपालाचे निलंबन करण्यात आले असून तुमची नेमणूक लातूरला करण्यात येत आहे. तुम्ही ताबडतोब औरंगाबादचा कार्यभार देऊन तिथे हजर व्हावे. त्या काळी नियतकालिक बदल्यांबद्दलचा कायदा नव्हता व आदेशांचे पालन करण्याची परंपरा होती. लातूर येथील शालेय शिक्षणाचे माॅडेल " लातूर पॅटर्न" म्हणून राज्यात प्रसिद्ध होते आणि माझी मुलगी माध्यमिक शाळेत शिकत होती. सर्व अर्थाने हा बदल सोयीचा होता म्हणून मी लातूरला हजर झालो. निलंबनामुळे लातूरचा अतिरिक्त कार्यभार उदगीरच्या अधिकाऱ्याकडे होता तो घेतला व कुटुंब देखील लातूरला हलवले.
लातूर जिल्ह्यात अत्यल्प वनक्षेत्र असल्याने तो उस्मानाबाद वनविभागाचाच एक घटक होता म्हणून जिल्हास्तरावर प्रतिनिधित्व करायची जबाबदारी ओघाओघाने माझ्याकडे आली होती. एक वनपाल, तीन वनरक्षक व दोन वन मजूर असा छोटासा कर्मचारी वृंद होता, लिपिक व लेखापाल नव्हते. कालिदास जाधव हा वनमजूर कार्यालयीन काम पहात होता. औरंगाबादला सुमारे साठ कर्मचारीवृंद होते. मराठवाड्याची राजधानी होती , वन विश्राम गृह होते शिवाय अजिंठा - वेरूळच्या लेण्या पहायला येणाऱ्या पाहुणे मंडळीचा राबता होता. या मुळे मला माझ्यातल्या नाट्य, साहित्य, संगीत अशा मनोरथाच्या अश्वांना आवरून धरावे लागले होते. इथे मी त्यांचे लगाम सैल केले.देशी केंद्र, केशवराज इत्यादी शाळा, दयानंद, छत्रपती शाहू या महाविद्यालयांमध्ये मी वन आणि वन्यजीवां बद्दल स्लाईडच्या माध्यमातून व्याख्याने दिली . नेचर क्लब स्थापन केले. दैनिक लोकमत मधून वन विकासावर लेख लिहीले. लातूर शहरात नाट्य चळवळीची मोठी परंपरा आहे,त्यांशी मी जोडला गेलो. १९९१ च्या वृक्षदिंडीत मी वन विभागाचा चित्ररथ केला त्याला महाराष्ट्राचे कृषी मंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. जागतिक वन दिनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी मोहन फडतरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला. विभागीय वनाधिकारी अपरिहार्य कारणास्तव येऊ शकले नाहीत.
माझ्या शैलीप्रमाणे सुरुवातीलाच मी कार्यालयातील सर्व संचिका, रजिस्टर्स, रोकडवही, मोजमाप पुस्तके, स्टोअर्सची झाडाझडती सुरू केली. पेठ येथील मध्यवर्ती रोपवाटिका, सर्वं रोपवने, पूर्वपावसाळी कामे, आरा गिरण्याना माझ्या नियमित भेटी व तपासण्या सुरू झाल्या. कामाचे निमित्त करून वनपाल सोबत यायला टाळाटाळ करत असे. वनरक्षक देखील क्वचितच कार्यालयात येत. दौऱ्यात भेटलेले लोक आश्चर्याने मला विचारू लागले तुम्ही कोण ? बुलेट मोटरसायकल वर येतात ते तुमचे साहेब आहेत का ? मी रेंज फॉरेस्ट ऑफिसर असून ते आधिनस्त वनपाल आहेत हे प्रत्येक ठिकाणी सांगावे लागे. वित्त, व्यसन आणि विलास यांच्या नादात तत्कालीन रेंज ऑफिसरने आपले अस्तित्वच मिटवून टाकले होते त्या मुळे ही अस्तित्वाचीच लढाई सुरू झाली होती.
एके दिवशी विभागीय कार्यालयातून एक पत्र आले. मौजे हरंगूळ येथे चंदन व्यापाऱ्याने , वृक्ष अधिकाऱ्याच्या परवानगीने शंभर चंदन वृक्ष तोडून पाच हजार किलो चंदन लाकूड साठवून ठेवले आहे. त्याला ते परराज्यात वाहतूक करावयाचे असून आपण घटना स्थळ तपासून अहवाल सादर करावा म्हणजे वाहतूक परवाना देण्या बाबत या कार्यालयातून आदेश देता येईल अशा आशयाचे ते पत्र होते. कालिदासला चंदन लाकडा विषयीच्या सर्वं संचिका काढायला सांगितल्या . तो थोडासा घुटमळला व चाचपडत म्हणाला " चंदनाची एकही फाईल आपल्या कार्यालयात नाहीये सर. मी तात्काळ उस्मानाबाद विभागीय कार्यालयाला गोपनीय पत्र लिहून चंदन विषयीच्या सर्व संचिका गायब असल्याचा अहवाल सादर केला व विभागीय कार्यालयातील संचिकां वरून दुसरी प्रत उपलब्ध करून देण्याची विनंती केली. विभागीय वनाधिकारी नाराज दिसले, कार्यालयात फाइली पहात बसण्यापेक्षा क्षेत्रीय कामावर लक्ष द्या असा सल्ला त्यांनी दिला. "माझ्याकडे संचिकाच नसतील तर तुम्ही मागणी केलेले अहवाल कसे देणार ? या प्रश्नाचे त्यांचेकडे उत्तर नव्हते. मला संचिकाच्या छायाप्रती कशा बशा मिळाल्या. त्या वाचल्यावर लक्षात आले की पूर्वीच्या वनक्षेत्रपालाने चंदन लाकडाला बनावट पासिंग हॅमर मारून बनावट वाहतूक परवाना दिला होता. तो परवाना मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये पकडला गेला. तेथून औरंगाबादच्या वनसंरक्षक कार्यालयास अहवाल प्राप्त झाल्यानंतर वनसंरक्षक औरंगाबाद वृत्त यांनी तडकाफडकी वनक्षेत्रपाल लातूर याला निलंबित केले होते. मला संत कबीर यांचा दोहा अठवला. " जो रहीम उत्तम प्रकृति का करित सदा कुसंग, चंदन वीष व्यापत नहीं, लपटे रहत भुजंग". चंदन वृक्षाला विषारी सापांचा विळखा असलातरी चंदन आपला सुगंधी गुणधर्म सोडत नाही आणि सापाचे वीष स्विकिरत नाही तसे सज्जन माणसे दुर्जनांचा सहवासात राहिले तरी दुर्गुण अंगी लागू देत नाहीत असा त्याचा अर्थ होता. म्हणून चंदन प्रकरणाचे नामकरण मी "ऑपरेशन भुजंग" करून टाकले.
त्या नंतर मी वनपालाला सांगितले केली की आपण घटनास्थळी पहाणी करण्यासाठी उद्या सकाळी दहा वाजता जाऊ. आपण साडेनऊला कार्यालयात या. ठरल्याप्रमाणे मी साडेनऊ पासून बारा वाजेपर्यंत वाट पाहिली, ते आलेच नाहीत. मला हे अपेक्षित नव्हते. पुन्हा दुसऱ्या दिवशी दहा वाजता जाण्याबाबत मी लेखी पत्र काढले व ठरल्यावेळी कार्यालयात हजर झालो. पुन्हा तोच प्रकार घडला. सायंकाळी चार वाजता वनपाल कार्यालयात आले व तावातावाने म्हणाले की किती वेळा त्या लाकडांची तपासणी करायची ? . मी म्हणालो मी तर पहिल्यांदाच करतोय ना ? त्या शिवाय अहवाल कसा देणार ? वनपालाने सरळ सांगितले "मी येणार नाही". पूर्वीच्या रेंज ऑफिसरच्या निष्क्रियता मुळे वनपाल सर्वेसर्वा झाले होते. तीन्ही वनरक्षक देखील त्याच कंपूत सामिल झाले होते. रात्र वैऱ्याची होती.
विभागीय कार्यालयातून मिळालेली चंदन वृक्षतोडीची संचिका मी काळजीपूर्वक अभ्यासायला सुरुवात केली आणि एका क्षणी माझ्या लक्षात आले की ज्या सात बाराच्या उताऱ्यावर शंभर चंदन वृक्षांची नोंद दाखवून त्या आधारे वृक्ष तोडीची परवानगी रेंज ऑफिसर ने दिली आहे तिथे १ या आकड्या पुढे दोन शुन्य नंतर लिहीण्यात आले आहेत. त्याची शाई देखील वेगळी आहे. जबाब, पंचनामा व सर्व कागदपत्रे याच वनपाल महोदयांचे हस्ताक्षरात लिहीलेली आहेत. अवैध चंदन व्यापाराला मदत करणारं टोळकंच इथे वनाधिकाऱ्यांच्या रुपात एकत्र जमल्याचे लक्षात आले.
संबंधित तलाठ्याला पत्र लिहून मी सातबाऱ्याची व फेरफाराची नक्कल मागितली. पण त्याने दाद दिली नाही. मी उपविभागीय महसूल अधिकारी काळंब पाटील यांची भेट घेऊन कागदपत्रे मागितली. राजपत्रित अधिकारी महासंघाचा पदाधिकारी असल्याने माझी त्यांची ओळख होतीच. त्वरित काम झाले . फेरफार बोगस होता आणि सातबाऱ्यावर फक्त एकाच चंदनाच्या झाडाची नोंद होती. याचा अर्थ शंभर चंदन वृक्ष तोडीची रेंज ऑफिसरने दिलेली परवानगी बनावट होती व त्या आधारे तोड दाखवून केलेला सुमारे पाच हजार किलो चंदन लाकडाचा साठा हा देखील अवैध होता. माझे हे संशोधन चालू असतांनाच भराभर चक्रे फिरली. मी रोपवाटीकेत अपहार केल्याच्या तक्रारीची चौकशी करायला विभागीय वनाधिकारी येऊन गेले. रोपवाटीकेतील महिला कामगारांशी गैरवर्तन केल्याची तक्रार झाली. रोपवाटिकेत उंबर, वड पिंपळ हे वृक्ष होते, गुरुवारी पुजा होत होती, माझी पत्नी सुद्धा अधूनमधून तिथे येत असे, महिला कामगारांशी बोलत असे. मकर संक्रांतीचा वाण आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम तिने या महिलां सोबत केला होता . त्या मुळे सौहार्द आणि पावित्र्याचे वातावरण निर्माण झाले होते. रोपवाटीकेतील कामगारांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचा निष्कर्ष विभागीय वनाधिकाऱ्याला काढण्या शिवाय पर्याय नव्हता. नंतर हाताखालील अनुसूचित जातीच्या एका वनरक्षकाने जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपाचे शस्त्र वापरून पाहिले. त्याचेही बाष्पीभवन झाले.
योग्य ते पूर्व नियोजन करून , गोपनीयता बाळगून, वनपाल आणि वनरक्षक यांच्या शिवाय, वनमजूर कालिदास जाधव आणि हरंगूळ येथील काही प्रतिष्ठित लोकांच्या सहाय्याने , चंदन साठ्याची तपासणी केली, सुमारे पाच हजार किलो अवैध चंदन लाकूड जप्त करून रेंज कार्यालयात आणून खोलीत साठवले व चंदन व्यापाऱ्याच्या विरूद्ध गुन्हा नोंदवला. बाजारभावाने त्या लाकडाची किंमत सुमारे पाच लाख रुपये होती. किमती मालाची चोवीस तास राखण करावी लागेल म्हणून मी रोजंदारी मजूर नेमण्याची परवानगी मागितली पण ती नाकारण्यात आली. मी तात्काळ त्या मालाचा वीमा उतरवून घेतला. वनक्षेत्रपाल संघटनेचा अध्यक्ष असल्याने काही दिवसांनंतर मुंबईला मंत्रालयात गेलो असता समजले की लातूर वरून माझी तात्काळ बदली करावी अशी शिफारस मंत्रीमंडळातील वजनदार मंत्र्यानी केलेली आहे व कोणत्याही क्षणी बदली होऊ शकते.
मी लातूरला परत आलो. चंदन संचिकेचा सखोल अभ्यास झालेला होताच. १९९१ साली महसूल अधिकाऱ्यांचे , खाजगी क्षेत्रातील वृक्षतोडीला परवानगी देण्याचे अधिकार वन अधिकाऱ्यास प्रदान करण्यात आले होते. त्या अधिकाराचा वापर करून पाच हजार किलो चंदन लाकूड १९६४ च्या कायद्यानुसार सरकार जमा करून न्यायालयाच्या शैलीत सखोल कारणमीमांसा करणारा आदेश वृक्ष अधिकारी या नात्याने पारीत केला. तो आदेश दैनिक लोकमतचे स्थानीय वार्ताहर जयप्रकाश दगडे यांच्या हातात पडला. त्या वर त्यांनी सलग तीन लेखांची मालिकाच लोकमतमध्ये छापली. त्याना त्या वर्षी शोधपत्रकारीतेचा पुरस्कार देखील मिळाला. वृत्तपत्रातील बातम्यांमुळे विधान परिषदेत अतारांकित प्रश्न विचारला गेला. खोटी कागदपत्रे खरणाऱ्या अधिकाऱ्यां विरूद्ध पोलीस कारवाई करण्यात येईल असे उत्तर सरकारला द्यावे लागले. उत्तराची पूर्तता करण्यासाठी लातूर एम आय डी सी पोलीस स्टेशनला त्या सर्व अधिकाऱ्यां विरूद्ध एफ आय आर नोंदवावा लागला. माझे "ऑपरेशन भुजंग" पूर्ण झाले होते.
तो पर्यंत १९९२ सालचा मे महिना उजाडला होता माझी बदली वनक्षेत्रपाल फिरतेपथक म्हणून औरंगाबाद येथे झाली. व्यापाऱ्याने चंदन प्रकरणी, माझ्या निर्णया विरूद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली पण माझ्या नंतर लातूरला वनक्षेत्रपाल पदी राहिलेले माझे सहकारी टी.बी. कोहोक, पी. व्ही.जगत, बी. एस. घवले आणि उपविभागीय वनाधिकारी जी.ए.डेपे यांच्या पाठपुराव्या मुळे उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात निकाल वन विभागाच्याच बाजूने लागले. २००६ साली ते लाकूड एकोणीस लाख रुपयांना लिलावाद्वारे विकले गेले. हो एक विसरलोच , वृत्तपत्रात छापून आलेल्या त्या लेखमालेचे नाव होते " चंदनाची चोळी अंग अंग जाळी".
0 Comments