MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

हिरडा वनस्पती

हिरडा वनस्पती विषयी माहिती 

Division: Magnoliophyta

जात: Magnoliopsida

वर्ग: Myrtales

कुळ: Combretaceae

जातकुळी: Terminalia


मराठी नाव: हिरडा

इंग्रजी नाव: Myrobalans;

 शास्त्रीय नाव: Terminalia chebula

हिरडा

          'यस्यां नास्ति माता, तस्य माता हरितकी ' असे एक संस्कृत वचन आहे . याचा अर्थ म्हणजे आई नसलेल्या मुलांची आई म्हणजे हिरडा ' (  Terminalia chebula) यावरुन खरे तर याची महती लक्षात येते. आयुर्वेदाचे स्थान अनन्यसाधारण आहे. आयुर्वेदामध्ये जेवढी औषधे सांगितलेली आहेत त्या सर्व औषधांमध्ये सर्वश्रेष्ठ औषध जर कोणते असेल तर ते आहे हिरडा. 

                 हिरडा ( Terminalia chebula) हा वृक्ष माञ सध्या दुर्मिळ झाला आहे. हिरडा स्वास्थ्यसंवर्धक आणि रोगनाशक आहे   औषधांमध्ये आणि आरोग्य  वाढविणाऱ्या द्रव्यात याचे स्थान महत्त्वाचे आहे. याला हरितकी, हरदी, ओरडो, आरळे, हार अशी नावे आहेत. हिरड्याची झाडे २५ ते ३० मीटर उंच वाढणारी असतात. झाड झुपकेदार, पसरट व अनेक वर्षे टिकणारे असते. याचे लाकूड अत्यंत कठीण असते. खोडाचे साल करड्या रंगाचे त्यावर असंख्य चीरा असतात.  ग्रिष्म ऋतुत पांढरा पिवळसर रंगाची फुले येतात.  नवीन फुलांना सुवास असतो तर जुन्या फुलांचा वास उग्र असतो. कोवळ्या फळांचा रंग हिरवा तर पिकलेल्या फळांचा रंग पिवळसर धूसर असतो .२ ते २.५ महिन्यांच्या अपरीपक्व फळांना बाळ हिरडे म्हणतात.फळांच्या रंगावरून  विजया,  रोहिणी,  पूतना,  अमृता,  अभया,  जीवन्ती आणि चेतकी असे सात प्रकार सांगितले जातात. चांगल्या आरोग्याची इच्छा असणाऱ्याने प्रत्येक दिवशी हिरड्याचे सेवन करावे असे म्हणतात.

हिरड्यांची फळ

               हिरड्या  (  Terminalia chebula) मध्ये गोड, आंबट, कडू, तिखट आणि तुरट हे पाच रस आहेत.गोड, तिखट आणि तुरट रसांमुळे पित्त दोषाचा नाश होतो. कडू, तिखट आणि तुरट रसांमुळे कफ दोष दूर होतो. तर गोड आणि आंबट या रसांमुळे वात दोष दूर होतो. मधूमेहा सारख्या रोगात याचा खूप उपयोग होतो. अतिसार, अपचन, अंश पडणे, भूक न लागणे, मुळव्याध,नेञरोग, स्थूलता, अतिघाम येणे, अजीर्ण, रक्तपित्त, आम्लपित्त, पित्तशीळ, दाह, कुष्ठरोग, इसब, संधीवातातील ताप, उदररोग, मूतखडा, उचकी, उलटी, पांडूरोग अशा अनेक रोगांवर हिरडा महत्वपूर्ण औषध आहे.अर्श मूळव्याध रोगात हिरडा सैंधवाबरोबर देतात आणि  अर्श सुजून दुखत असल्यास हिरडा उगाळून लेप देतात.

Hirdyache khod
हिरड्याचे खोड

                   हिरड्यामध्ये (  Terminalia chebula) मेंदूची शक्ती वाढवण्याचे गुणधर्म आहेत. चरबी जाळण्याचा गुणधर्म असल्याने लठ्ठपणा कमी करण्यासाठीही यांचा वापर केला जातो. मुळव्याधी मध्ये १ ग्रॅम हिरडा, दूध व खडीसाखर एकत्र घेतल्यास थोड्याच दिवसात लाभ होतो.३ ग्रॅम हिरड्याची भुकटी भिजेल एवढा मध व दुप्पट तूप घालून चाटावी, श्वास थांबतो, हिरडा मधात खाल्ला तर खोकला कमी होतो.१ ग्रॅम हिरडा, दोन चिमट्या सुंठीचे चूर्ण, भिजेल एवढे तूप व गोड लागेल एवढी साखर घालून आव झालेल्या व्यक्तीस देतात, संडास साफ होऊन मुरडा थांबतो व त्वरित आराम पडतो.

                    पोटात होणारे सर्व विकार हिरडा (  Terminalia chebula) घेतल्याने बरे होतात.गॅसची समस्या असलेल्या लोकांसाठी याचा एक तुकडा तोंडात ठेवण्यास सांगतात. शरीरावरील एखादी जखम बरी करण्यासाठी त्याची मदत होते. त्वचेच्या जखमा, बुरशीजन्य संसर्ग इत्यादी बरे करण्यासाठी याचा अनेक काळांपासून वापर होत आहे.स्वादुपिंडातील इन्सुलिनच्या उत्पादनास गती मिळते. मधुमेहात याचा वापर केला जातो. स्त्री-पुरुषांची प्रजनन क्षमता वाढते आणि प्रजननक्षमतेशी संबंधित असलेले अनेक आजार यामुळे दूर होतात.हिरडा पाण्यात टाकून उकळवून ते पाणी थंड करून डोळे धुतल्याने डोळ्यांच्या संसर्गापासून आराम मिळतो.मधात हिरड्याची पावडर मिसळून त्याचे एक चाटण तयार करा. रात्री झोपण्यापूर्वी हे चाटण घ्या ज्यामुळे रात्री तुम्हाला निवांत झोप लागेल. नियमित हा उपचार केल्यामुळे हळूहळू तुमचा खोकला अथवा सर्दी कमी होईल. नियमित हिरडा कोमट पाण्यातून घेतले तर वजन कमी होते. सांधेदुखीचा त्रास मुळापासून कमी करण्यासाठी  हिरड्याचा वापर केला जातो. हिरडा चुर्ण दंतमंजनप्रमाणे वापरल्यास दात निरोगी राहतात शिवाय दात चमकदारही होतात. 

         चैत्र, वैशाख मध्ये मधा सोबत, ज्येष्ठ, आषाढ मध्ये गुळा सोबत. श्रावण, भाद्रपद मध्ये सैंधव मिठा सोबत. आश्विन, कार्तिक मध्ये साखरे सोबत. मार्गशीर्ष, पौष मध्ये सुंठी सोबत,  माघ, फाल्गुन मध्ये पिंपळी सोबत हिरड्यांचे सेवन करावे असे सांगितले जाते.

               हिरडा (  Terminalia chebula)  ही एक उष्ण प्रवृत्तीची वनस्पती आहे. म्हणूनच गरोदरपणात हिरड्याचा वापर टाळतात. त्याचप्रमाणे तान्हे बाळ आणि पाच वर्षांच्या खालील मुलांना हिरडा अतीप्रमाणात देणे धोकादायक ठरू शकते. स्तनपान देणाऱ्या मातेनेही हिरड्याचा (  Terminalia chebula) वापर आहारात करू नये असे सांगितले जाते. 

Post a Comment

0 Comments