भारतीय वन अधिनियम, 1927 कलम 35 | विशिष्ट कारणांसाठी वनाचे संरक्षण करण्याची शक्ती
भारतीय वन अधिनियम, 1927 कलम 34
कलम 35. विशिष्ट कारणांसाठी वनाचे संरक्षण करणे.- (1) राज्य शासन राजपत्रात अधिसूचनेद्वारे
(i) कोणत्याही वनात खालील बाबींचे विनियमन किंवा प्रतिबंध करू शकेल -
(अ) शेतीसाठी जमिनीचे विच्छेदन किंवा वृक्ष तोडून साफ करणे;
(बी) गुरे चारणे;
(सी) झाडे-झुडपे जाळणे किंवा काढून टाकणे;
(डी) कोणत्याही वृक्षास वाटोळे करवून घेणे, छेदणे, जाळणे किंवा कोणत्याही वृक्षाची साल काढणे किंवा पाने तोडणे;
(ई) वृक्ष छाटणे किंवा त्यांचे शेंडे कापणे;
(एफ) वृक्ष व इमारती लाकडे कापणे, त्याचे करवतीने तुकडे करणे, ती घडविणे किंवा ती काढून नेणे; किंवा
(जी) खाणी खणून दगड काढणे किंवा चुन्याची अथवा कोळशाची भट्टी लावणे किंवा कोणतेही वन उत्पादन गोळा करणे किंवा ते काढून नेणे किंवा ते तयार करण्याची कोणतीही प्रक्रिया त्यावर करणे.
(ii) कोणत्याही वनात, वनाची पुनर्निर्मिती व त्याचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी विनियमन करणे;
जेव्हा सदर विनियमन किंवा प्रतिबंध खालील पैकी कोणत्याही प्रयोजनार्थ आवश्यक वाटत असेल:-
(अ) वृक्ष व वने यांचे संवर्धन करण्यासाठी;
(बी) मातीचे परिरक्षण आणि तिची सुधारणा करण्यासाठी, किंवा खारवट अथवा पाणथळ जमीन पुनःस्थापित करण्यासाठी किंवा जमिनीचे विस्खलन होऊ नये किंवा खोल अरुंद दऱ्या होऊ नयेत अथवा पाण्याचे खोल ओहोळ आणि लोट निर्माण होऊ नयेत किंवा जमिनीची धूप होण्यापासून किंवा तिच्यावर वाळू, दगड किंवा कंकर यांचा थर जमा होण्यापासून तिचे संरक्षण करण्यासाठी;
(सी) चराईमधील सुधारणा करण्यासाठी;
(डी) झऱ्यात, नद्यात व तळ्यात पाण्याच्या पुरवठ्याची देखभाल करण्यासाठी;
(ई) वैरण, पानापासून तयार होणारे खत, इमारती लाकूड किंवा जळण यांची देखभाल करणे आणि वाढ करणे, पुरवठा कायम राखण्यासाठी व त्याचे वाटप करण्यासाठी;
(एफ) पाण्याचे साठे किंवा पाटबंधा-याची कामे आणि जलविद्युत कामे सुस्थितीत राखण्यासाठी;
(जी) वादळ, वारा, गडगडत येणारे दगड, पूर व अवर्षण या पासून संरक्षण करण्यासाठी;
(एच) रस्ते, पूल, रेलमार्ग आणि दळणवळणाचे इतर मार्ग याचे संरक्षण करण्यासाठी; आणि-
(आय) सार्वजनिक आरोग्याचे परिरक्षण करण्यासाठी---
(2) अशा कोणत्याही प्रयोजनासाठी राज्य शासन स्वतःच्या खर्चाने कोणत्याही वनात योग्य वाटेल, असे कोणतेही बांधकाम उभारू शकेल.
(3) राज्य शासनाकडून त्यासंदर्भात प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने अशा वनाचे मालकास अशी अधिसूचना का निर्गमित करण्यात येऊ नये, किंवा यथास्थितीत बांधकाम का उभारण्यात येऊ नये, याबाबत नोटीस जारी करून उक्त नोटीसीत निर्दिष्ट वाजवी मुदतीच्या आत कारणे दर्शविण्याबद्दल निर्देश दिल्याशिवाय आणि त्याप्रयोजनार्थ रीतसर नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्याकडून त्या व्यक्तीला असलेल्या हरकतीबाबत सादर करण्यात आलेल्या पुराव्यासंदर्भात सुनावणी झाल्याशिवाय आणि राज्य शासनाकडून त्याचा विचार झाल्याशिवाय पोट कलम (1) खाली कोणतीही अधिसूचना केली जाणार नाही किंवा पोट कलम (2) खाली कोणतेही बांधकाम सुरू केले जाणार नाही.
(4) पोट कलम (1) अन्वये अधिसूचना का काढण्यात येऊ नये, या बद्दल कारण दर्शविण्यास ज्या नोटीसीद्वारे निर्देश देण्यात आले असेल त्याच नोटीसीद्वारे असेही दर्शविता येईल की, एक वर्षाहून अधिक नसेल, अशी कोणतीही मुदत किंवा अधिसूचना काढण्यात येईल, त्या तारखेपर्यंत होणारी मुदत, या दोन्हीपैकी जी अगोदरची असेल, त्या मुदतीत अशा वनाच्या मालकाने किंवा अशा वनात ज्यास कोणत्याही हक्कामुळे किंवा स्वामित्व अधिकारामुळे किंवा कोणत्याही हितसंबंधामुळे किंवा कोणत्याही परवाना अन्वये किंवा करारान्वये किंवा अन्य रीतीने पोट कलम (1) चे खंड (1) मध्ये निर्दिष्ट केलेल्या गोष्टीपैकी कोणतीही गोष्ट किंवा सर्व गोष्टी करण्याचा हक्क असेल किंवा त्या गोष्टी करण्याची परवानगी मिळालेली असेल, अशा सर्व व्यक्तींनी नोटीसीच्या तारखेनंतर आणि यथास्थिती उपरोल्लेखित मुदतीत किंवा उपरोल्लेखित तारखेपर्यंत तसेच उक्त नोटीसीत निर्दिष्ट केलेल्या मर्यादेपर्यंत पोट कलम (1) चे खंड (1) मध्ये निर्दिष्ट केलेल्या गोष्टीपैकी कोणतीही गोष्ट किंवा त्या सर्व गोष्टी करता कामा नयेत.
(5) पोट कलम (3) खाली निर्गमित नोटीस, दिवाणी प्रक्रिया संहिता, 1908 यात आज्ञापत्र बजावण्यासाठी ज्या रीतीची तरतूद करण्यात आलेली आहे, त्याच रीतीने अशा वनाच्या मालकावर बजावण्यात येईल आणि ती नियमान्वये विहित केलेल्या रीतीने प्रसिद्ध करण्यात येईल.
(5-अ) जेव्हा पोट कलम (3) खाली निर्गमित नोटीस, पोट कलम (5) अनुसार वनाच्या मालकावर बजावण्यात आली असेल तेव्हा ज्या कोणत्याही व्यक्तीने त्या वनाचा स्वामित्वाधिकार तद्नंतर संपादन केला असेल त्या कोणत्याही व्यक्तीवर, अशी नोटीस जणू ती अशा वनाचा मालक म्हणून त्याच्यावर बजावण्यात आली होती असे समजून, बंधनकारक असेल आणि तदनुसार तो त्या कलमान्वये निर्गमित केलेल्या कोणत्याही नोटीशीचे, दिलेल्या आदेशाचे व काढलेल्या अधिसूचनेचे पालन करेल.
(6) पोट कलम (1) अन्वये अधिसूचना का काढण्यात येऊ नये, या बद्दल कारण दर्शविण्यास ज्या नोटीसीद्वारे निर्देशित केले असेल त्याच नोटीसीवरून पोट कलम (4) अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस, त्यास दोषी ठरविण्यात आल्यावर सहा महिने मुदतीपर्यंत कारावास किंवा द्रव्यदंड किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
(7) पोट कलम (1) अन्वये काढलेल्या अधिसूचनेच्या तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस, दोषी ठरविण्यात आल्यावर सहा महिने मुदतीपर्यंत कारावास किंवा द्रव्यदंड किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
संबंधी पोस्ट
1. भारतीय वन अधिनियम 1927 कलम 36
2. भारतीय वन अधिनियम, 1927 कलम 34
3.
0 Comments