वनरक्षकांची ज्येष्ठता कशी निश्चित केली जाते? वनपाल पदावरील पदोन्नतीसाठी महत्त्वाचे नियम
वनरक्षक पदावर नियुक्ती झाल्यानंतर प्रत्येक वनरक्षकाची गुणवत्तेनुसार (Merit) ज्येष्ठता निश्चित केली जाते. ही ज्येष्ठता भविष्यात वनपाल (Forester) पदावर पदोन्नती देताना अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळ े स्पर्धा परीक्षा आण ि प्रशिक्षण परीक्षेतील गुणांचा थेट परिणाम वनरक्षकाच्या पदोन्नतीच्या क्रमावर होतो.
वनपाल पदासाठी वनरक्षकांची ज्येष्ठता कशी निश्चित केली जाते?
महाराष्ट्र शासनाच्या वनरक्षक - वनपाल सेवा प्रवेश नियम, 2025 नुसार वनरक्षकांची गुणवत्ता (Merit) खालीलप्रमाणे निश्चित केली जाते.
- स्पर्धा परीक्षेतील गुण – 50%
- प्रशिक्षण संस्थेतील अंतिम परीक्षेतील गुण – 50%
या दोन्ही परीक्षांतील गुणांना समान महत्त्व (50-50%) देऊन अंतिम गुणवत्ता (Final Merit) तयार केली जाते. याच अंतिम गुणवत्ता यादीच्या आधारे वनरक्षकांची वनपाल पदावरील पदोन्नतीसाठी ज्येष्ठता निश्चित केली जाते.
उदाहरण 1
समजा, दोन वनरक्षकांची गुणवत्ता खालीलप्रमाणे आहे.
| तपशील | वनरक्षक अ | वनरक्षक ब |
|---|---|---|
| स्पर्धा परीक्षेतील गुण | 80 | 72 |
| प्रशिक्षण परीक्षेतील गुण | 70 | 82 |
| स्पर्धा परीक्षेचे 50% | 40 | 36 |
| प्रशिक्षण परीक्षेचे 50% | 35 | 41 |
| अंतिम गुणवत्ता (Merit) | 75 | 77 |
या उदाहरणात वनरक्षक ब याला अंतिम गुणवत्ता 77 गुण मिळाले आहेत, तर वनरक्षक अ याला 75 गुण मिळाले आहेत. त्यामुळे वनरक्षक ब याचा वनपाल पदावरील पदोन्नतीसाठीच्या ज्येष्ठता यादीत क्रम वनरक्षक अ पेक्षा वर राहील.
उदाहरण 2 (समान गुणवत्ता असल्यास)
समजा,
- वनरक्षक अ – अंतिम गुणवत्ता : 76 गुण (वय 28 वर्षे)
- वनरक्षक ब – अंतिम गुणवत्ता : 76 गुण (वय 31 वर्षे)
दोघांचे अंतिम गुणवत्ता गुण समान असल्यामुळे वयाने ज्येष्ठ असलेल्या वनरक्षक ब याला ज्येष्ठता यादीत प्राधान्य दिले जाईल.
महत्त्वाची बाब: वनपाल पदावर पदोन्नतीसाठी केवळ स्पर्धा परीक्षेतील गुण महत्त्वाचे नसून, प्रशिक्षण संस्थेतील अंतिम परीक्षेतील गुणही तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे प्रशिक्षणादरम्यान चांगली कामगिरी केल्यास अंतिम गुणवत्ता सुधारते आणि भविष्यात वनपाल पदावर पदोन्नतीची संधी अधिक लवकर मिळू शकते.

0 Comments