Wildlife Attack Death Cases: पंचनाम्याची वाट न पाहता मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवा
वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी पाठविण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना
वन्यजीवांच्या हल्ल्यांमुळे होणाऱ्या मनुष्यहानीच्या घटनांमध्ये अनेकदा गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होते. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची तसेच वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त होण्याची शक्यता असते.
ही बाब लक्षात घेऊन वनसंरक्षक (प्रादेशिक), नागपूर यांनी दिनांक 10.06.2026 रोजी एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. या सूचनेनुसार वन्यजीवांच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृत्यूची खात्री झाल्यानंतर पोलिसांच्या पंचनाम्याची वाट न पाहता संबंधित पोलीस स्टेशनला कळवून मृतदेह तात्काळ ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात यावा.
नागपूर वनवृत्तांत येणारे भंडारा, वर्धा, गोंदिया आणि नागपूर वनविभाग तसेच विविध व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य क्षेत्रांमध्ये मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मृतदेह घटनास्थळी दीर्घकाळ ठेवला गेल्यास ग्रामस्थांचा रोष वाढण्याची आणि परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असते.
म्हणूनच लोकांमधील तणाव कमी करण्यासाठी, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि पुढील शासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील पंचनामा व कायदेशीर कार्यवाही रुग्णालयात पूर्ण करता येईल. तसेच या संदर्भात पोलिस प्रशासनाशी आवश्यक समन्वय ठेवण्याच्या सूचनाही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

0 Comments