मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मलकापूर गोंड येथील नदी वजा नाल्यात गोलाकार दगड सापडतात. विशेष म्हणजे संपूर्ण मेळघाटात केवळ याच ठिकाणी हे फुटबॉलप्रमाणे गोलाकार दगड सापडतात. मेळघाटात असे गोलाकार दगड सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून सर्वत्र ते चर्चेचा विषय ठरत आहे. मलकापूर गावात हनुमानाच्या मंदिरात या गोलाकार दगडांची पूजा केली जाते त्यामुळे हे मंदिर सर्वत्र गोल्यादेवाची मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. १९९० साली विजय भोसले हे अकोट वनपरिक्षेत्र अधिकारी त्यांनी मलकापूर गोंड गावातील गोल्यादेवची उत्सुकतेने चौकशी केली. त्यावेळी गोल्यादेव नाल्यात गोलाकार दगडांचा खजिना त्यांना आढळून आला. एका एका दगडाचा घेर १५० से.मी. असल्याचे दिसून आले. त्यावेळी वन विभागाकडे असणाऱ्या जयश्री हत्तीण आणि तिचा माहूत कालू चिमटे यांच्या मदतीने एक दगड तीनशे किलो वजन असणारे सुमारे ८० दगड सलग दोन महिने प्रयत्न करून बाहेर काढण्यात आले. तज्ञांच्या मतानुसार या दगडांमध्ये भरपूर खनिज द्रव्य आहेत. या ठिकाणी पाण्याचे प्रमाण अधिक असून नदी उंचावरून खाली वाहते तिथे हे दगड आढळतात. पाणी उंचावरून खाली वाहणाऱ्या नदीच्या वेगासोबत दगडांची मोठ्या प्रमाणात झीज होते. या ठिकाणी यांत्रिकी विदारण मोठया प्रमाणात होते, आणि सोबत रासायनिक विदारणही होते. या दोन्ही विदारणांमुळे दगडांचा आकार गोल झाला असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. निसर्गातील या अद्भुत चमत्कारामुळे स्थानिक आदिवासी बांधवांनी यातील काही दगड हनुमान मंदिरात ठेवत याची पूजा करायला सुरुवात केली. त्यामुळे मलकापूर गोंड येथील मंदिर आता गोल्यादेवाचे मंदिर म्हणून सर्वत्र परिचित झाले आहे.
0 Comments