भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 79
नमस्कार,
मी आज भारतीय वन अधिनियम 1927 मधील कलम 79 बाबत सांगणार आहे. सदर अधिनियमाचे कलम 79 हे अत्यंत महत्वाचे आहे असे माझे मत आहे. याचे कारण मी स्पष्ट करणार आहे. वनविभागातील वनरक्षक,वनपाल हे क्षेत्रीय वन कर्मचारी हे अत्यंत दुर्गम भौगोलीक दृष्ट्या कठीण अशा जंगल भागात वन संरक्षणासाठी सेवा बजावत असतात. अशा वनरक्षक,वनपाल या क्षेत्रीय वन कर्मचारी यांना कठीण भौगोलीक परीस्थिती मध्ये सदर वनसंरक्षणाचे काम करीत असताना स्थानीक ठीकाणी मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. याचा विचार करूनच भारतीय वन अधिनियम 1927 मध्ये कलम 79 तयार केले असावे असे वाटते. सदर कलम 79 पोट कलम (1) नुसार एखाद्या राखीव कींवा संरक्षित वनात, जी व्यक्ती कोणताही हक्क उपभोगत असेल, कींवा ज्या व्यक्तीला कोणतेही वन उत्पादन त्या वनातून घेण्याची , कींवा इमारती लाकडे कापण्याची ती काढून नेण्याची, गुरे चारण्याची परवानगी देण्यात आली असेल आणि अशा कोणत्याही व्यक्तीने अशा वनात ज्यांना कामावर ठेवले असेल ती प्रत्येक व्यक्ती म्हणजेच ज्या स्थानीक लोकांची वनात वहीवाट आहे असे लोक ,वनातील वर नमूद बाबी संदर्भात त्यांना परवानगी दिली आहे अशी प्रत्येक व्यक्ती तसेच वनालगतच्या कोणत्याही गावातील ज्या व्यक्तिस शासनाने कामावर ठेवले असेल आणि समाजास उपयुक्त अशी सेवा करण्यासाठी ज्यास शासनाकडून वित्तलब्धी मिळत असेल अशा प्रत्येक व्यक्ती, एकंदर वनलगतच्या गावातील प्रत्येक व्यक्ती व त्या प्रत्येक गावात काम करणारा शासनाचा पगार घेणारा कोणताही व्यक्ती, त्यास कोणताही वन अपराध केल्याची कींवा तसा अपराध करण्याच्या इराद्याची जी माहीती असेल , ती निष्कारण विलंब न लावता नजीकच्या वन अधिका-यास कींवा पोलीस अधिका-यास देणे बंधनकारक आहे.सदर कलमाच्या पोट कलमानुसार वनात कोठे आग लागली त्याची माहीती देणे. वनात आग लागल्याचे कळल्यानंतर आग पसरू नये म्हणून आपल्या अधिकारात असलेल्या वैध उपायांनी ती थांबविण्यासाठी उपाययोजना करील आणि वन अधिकारी कींवा पोलीस अधिकारी यांना सहाय्य करणे. वनात अपराध होऊ नये म्हणून उपाययोजना करणे,वन अपराधातील आरोपीचा शोध घेणे त्यास अटक करणे कामी मदत करणे हे वनालगतच्या प्रत्येक व्यक्तीला व सदर प्रत्येक गावात काम करणा-या शासनाचा पगार घेणा-या प्रत्येक व्यक्तीला बंधनकारक आहे.
सदर गोष्टी करण्यास कसूर केली तर सदर कलमाच्या पोट कलम (2) नुसार सदर कसूर करणारी व्यक्ती एक महीना मुदती पर्यंतचा कारावास कींवा दोनशे रूपये पर्यंतचा द्रव्यदंड कींवा दोन्ही शिक्षेस पात्र राहील अशी तरतूद आहे. मला येथे असे सांगायचे आहे की, सदर कलम 79 नुसार कठीण भौगोलीक परीस्थिती काम करणा-या क्षेत्रीय वन कर्मचारी यांना मदत होण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे. ज्यावेळी ग्रामसभा होते त्यावेळी सदर कलम 79 मधील कायदेशीर तरतूद प्रत्येक ग्रामस्थ व गावात काम करणारा शासनाचा पगार घेणारा प्रत्येक व्यक्ती यांचे निदर्शनास आणली पाहीजे. म्हणजेच वन संरक्षणाच्या कामात यांची जबाबदारी काय आहे हे त्यांना समजेल.
......धन्यवाद.....
Tag ##
0 Comments