वनांचे आगीपासून संरक्षण : महाराष्ट्र वन नियमावली, 2014 मधील नियम 3 ते 8
भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 26(1)(ब) अन्वये राखीव वनास आग लावणे तसेच राज्य शासनाने या संबंधी केलेल्या नियमांच्या विरुद्ध आग पेटविणे किंवा जळती आग अशा प्रकारे ठेवणे, ज्यामुळे राखीव वनास धोका निर्माण होऊ शकतो, हे प्रतिबंधित करण्यात आले आहे.
तसेच, भारतीय वन अधिनियम, 1927 मधील कलम 32(ह) अन्वये संरक्षित वनातील लाकूड व कलम 30 अंतर्गत राखीव वृक्ष इत्यादींचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी राज्य शासनास नियम करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
या वैधानिक तरतुदींच्या अनुषंगाने महाराष्ट्र वन नियमावली, 2014 च्या अध्याय-II मध्ये “Protection of Reserved and Protected Forest from Fire” या विषयाखाली नियम 3 ते 8 करण्यात आले आहेत. नियम 3 ते 6 हे राखीव वनांतील आगीपासून संरक्षणासंबंधी असून त्यांना कलम 26(1)(ब) चा संदर्भ देण्यात आला आहे; तर नियम 7 हा संरक्षित वनांच्या आगीपासून संरक्षणासंबंधी असून त्याला कलम 32(ह) चा संदर्भ देण्यात आला आहे. नियम 8 मध्ये पावसाळी हंगामात या नियमांच्या लागू होण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे.
वरील वैधानिक तरतुदींच्या अनुषंगाने महाराष्ट्र वन नियमावली, 2014 मधील नियम 3 ते 8 मध्ये राखीव व संरक्षित वनांचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत.
राखीव आणि संरक्षित वनांचे आगीपासून संरक्षण
(अ) राखीव वने
[ भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) (ब)]
3. राखीव वनातून जाणारे रस्ते, वाटा किंवा त्यांच्या लगतच्या क्षेत्रात आग पेटविण्यास मनाई. — उप वनसंरक्षक यांनी वेळोवेळी अधिसूचित केलेल्या स्थळांच्या व्यतिरिक्त, इतरत्र कोणतेही सार्वजनिक किंवा खाजगी रस्ते, वाटा ज्या वनालगत आहेत आणि राखीव वनातून जातात परंतु ज्यांचा काही भाग वनात येत नाही, अशा क्षेत्रात कोणतीही व्यक्ती आग पेटविणार नाही किंवा पेटविलेली आग ज्वलंत सोडणार नाही.
4. राखीव वनांच्या नजीक राखेचे खत तयार करताना बाळगण्याची सावधगिरी. — खालील सावधगिरीचे उपाय असल्याशिवाय कोणतीही व्यक्ती राखीव वनाच्या हद्दीपासून 200 मीटर अंतराच्या आत, कोणत्याही क्षेत्रावर राखेचे खत तयार करण्याकरिता राब पेटविणार नाही,
(1) राब पेटविलेल्या हद्दीपासून वनांची हद्द कमीतकमी 12 मीटर रुंदीच्या पट्ट्याची असावी, आणि हा पट्टा आग वाहक झाडी-झुडपे साफ केलेला असावा; आणि
(2) इतर सावधगिरीचे उपाय जसे; आग प्रतिबंधक रखवालदारांची नेमणूक इत्यादी पुरेसे उपाय योजून करून आग वनामध्ये पसरणार नाही.
5. राखीव वनांपासून 200 मीटर अंतराच्या आत आग पेटविण्यास मनाई. — वनपरिक्षेत्र अधिकारी यापेक्षा कमी दर्जा नसलेल्या वन अधिकाऱ्याच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय राखीव वनांच्या हद्दीपासून 200 मीटर अंतराच्या आत, राखेचे खत तयार करणे, मानवी वसाहत किंवा अशा वसाहतींच्या प्रांगणात आग पेटविणे व्यतिरिक्त, इतरत्र आग पेटविता येणार नाही.
6. राखीव वनांच्या हद्दीपासून 200 मीटर अंतराच्या पलीकडे आग पेटविताना घ्यावयाची सावधगिरी. — जर नैसर्गिक कारणांनी आग वनात पसरण्याची शक्यता असेल, तर 12 मीटर रुंदीची आग प्रतिबंधक रेषा घेणे अथवा आग प्रतिबंधक रखवालदार नेमून अशी आग वनात पसरण्याची शक्यता रोखण्यासाठी सावधगिरी बाळगल्याशिवाय, राखीव वनांच्या हद्दीपासून 200 मीटर अंतराचे पलीकडेही कोणतीही व्यक्ती आग पेटविणार नाही किंवा पेटविलेली आग ज्वलंत सोडणार नाही.
(ब) संरक्षित वने
[ भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 32 (एच)]
7. संरक्षित वनांच्या हद्दी पलीकडे आग पेटविताना बाळगण्याची सावधगिरी. — आवश्यक सावधगिरी न घेता संरक्षित वनांच्या हद्दीपलीकडे कोणतीही व्यक्ती आग पेटविणार नाही किंवा पेटविलेली आग ज्वलंत सोडणार नाही, जेणेकरून कलम 30 (अ) मधील राखीव वृक्ष तसेच इतर इमारती लाकूड, उभे, उन्मळून पडलेले, तोडलेले वृक्ष, किंवा कलम 30 (ब) मधील बंद भाग किंवा कलम 33 अनुसार चारा तथा वनोपज गोळा करण्यास, निलंबित करण्यात आलेल्या क्षेत्रात, सदर आग पसरू शकेल.
(क) पावसाळी हंगाम या नियमापासून मुक्त करणे.
8. पावसाळी हंगामात हे नियम अंशतः लागू असणे. — या प्रकरणातील नियमांत दिनांक 15 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत काहीही लागू राहणार नाही.
पर्यायी पोस्ट
1. महाराष्ट्र वन नियमावली, 2014
2. महाराष्ट्र वन नियमावली, 2014 नियम 31
3. महाराष्ट्र वन नियमावली, 2014 नियम 32
4. महाराष्ट्र वन नियमावली, 2014 नियम 53
5. महाराष्ट्र वन नियमावली, 2014 नियम 79
6.महाराष्ट्र वन नियमावली, 2014 नियम 83
0 Comments