सोशल मीडियावर Reels/Short Video तयार करताना शासकीय पद, गणवेश व संसाधनांचा वापर केल्यास कारवाई; मुख्य वनसंरक्षकांचे निर्देश
दिनांक : 28.07.2026
सोशल मीडियावर Reels, Short Videos, Vlogs तयार करताना शासकीय पद, गणवेश, कार्यालय, वाहने, राज्यचिन्ह तसेच इतर शासकीय संसाधनांचा वापर करून वैयक्तिक प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी Instagram, Facebook, YouTube आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Reels, Short Videos आणि Vlogs तयार करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या व्हिडिओंच्या निर्मितीदरम्यान शासकीय कार्यालय, शासकीय वाहने, शासकीय गणवेश, पदनाम, अधिकृत अभिलेख, राज्यचिन्ह तसेच इतर शासकीय संसाधनांचा वापर करून वैयक्तिक प्रसिद्धी व फॉलोअर्स वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. अशा प्रकारामुळे शासन व प्रशासनाची प्रतिमा मलिन होण्याची तसेच नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांनी सर्व संबंधित उपवनसंरक्षकांना प्राप्त तक्रारीची सखोल चौकशी करून लागू नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांना कळवून त्याची प्रत मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे सादर करण्यास सांगितले आहे.
या निर्देशांमुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना शासकीय आचारसंहिता, सेवा नियम आणि शासकीय संसाधनांच्या वापराबाबत अधिक दक्षता बाळगणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
: सोशल मीडिया रील्स नियम, वन विभाग आदेश, सरकारी कर्मचारी सोशल मीडिया नियम, महाराष्ट्र वन विभाग, Reels Short Video Guidelines, सरकारी गणवेश वापर नियम, सरकारी कर्मचारी YouTube नियम, गडचिरोली वन विभाग.

0 Comments