ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दैनंदिन कर्तव्य बजावताना कर्तव्याधीन कर्मचा-यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात अनेक वन्यजीवांचा मुक्त संचार आहे. या वनक्षेत्रात दैनंदिन कर्तव्य बजावताना कर्तव्याधीन कर्मचा-यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. तरी, सदर मार्गदर्शक सुचना आपले स्तरावरुन क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळविण्याची व अवलंब करण्याची कार्यवाही तातडीने करावी.
१) अधिवासाचे व्यवस्थापन, अग्निरेषा व्यवस्थापन अशा गोष्टी शक्यतो यांत्रिक पद्धतीने करण्यात याव्यात. तशा स्वरुपाची अन्य कामे करताना वर्तुळ (round) हा घटक मानून त्या वर्तुळातील सर्व वनरक्षक, मदतनीस व रोजंदारी कामगार हे एका ठिकाणी येऊन काम करतील. किमान २० च्या संख्येत व्यक्ती कामाच्या ठिकाणी उपस्थित असाव्यात. यावेळी वनपाल हे स्वतः उपस्थित राहून सुरक्षेबाबत नियंत्रण ठेवतील. तसेच अशा समूहाच्या मदतीसाठी एक चारचाकी वाहन त्या ठिकाणी उपलब्ध असेल याची दक्षता संबंधित वनक्षेत्रपाल यांनी घ्यावी.
२) गस्त करताना वर्तुळ स्तरावर समूह तयार करुन गस्त करावी. तसेच कोर विभागात जेथे मनुष्याचा हस्तक्षेप नाही अशा ठिकाणी न करता गावानजीक व बफरकडील बाजूने जेथे मानवी हस्तक्षेप आहे, अशा ठिकाणी प्राधान्याने करावी.
३) उपसंचालक (कोर) यांनी कोर विभागात दुर्गम ठिकाणी व जेथे मानवी हस्तक्षेप नाही अशा ठिकाणच्या संरक्षण कुट्यांची उपयुक्तता तपासून त्यांचे पुननियोजन करावे. शक्यतो अशा कुट्या मानवी हस्तक्षेपाची शक्यता जास्त असणाऱ्या क्षेत्रालगत सुरु कराव्यात.
४) पायदळ गस्तीच्या वेळी समोर धोकादायक वन्यप्राणी आढळल्यास, ताज्या खुणा आढळल्यास तात्काळ परत फिरुन सुरक्षित ठिकाणी जावे व बिनतारी संदेश यंत्रणेमार्फत तात्काळ परिक्षेत्र कार्यालय / नजीकचे बेस स्टेशन यास सुचित करावे.
५) ज्या कोणत्या बिनतारी संदेश स्टेशनला अशी सुचना / संदेश प्राप्त होईल, त्यांनी तात्काळ इतर सर्व संदेश बंद करावेत व वरिष्ठ अधिका-यांना कळवून मदत पाठविण्याबाबत किंवा ईतर कार्यवाही तात्काळ सुरु करावी.
६) गस्त करताना किंवा अन्य कारणाने वनक्षेत्रात वावरताना रस्ता / पाऊलवाट सोडून दाट वनक्षेत्रात आडवळणी जाऊ नये.
७) विभागीय स्तरावर असणा-या शस्त्रांचा पुरवठा क्षेत्रीय स्तरावर करण्यात यावा. ज्यांचे शस्त्र प्रशिक्षण झालेले आहे, केवळ अशाच अधिकारी-कर्मचारी यांना शस्त्र देण्यात यावे व शस्त्र हाताळायच्या नियमावलीबाबत त्यांना अवगत करुन देण्यात यावे.
८) ज्यांचे शस्त्र प्रशिक्षण झालेले नाही, अशा अधिकारी-कर्मचा-यांच्या शस्त्र प्रशिक्षणाबाबत विभागीय स्तरावरुन नियोजन करावे.
९) वनक्षेत्रात दुचाकीचा अनावश्यक प्रवास टाळावा. धोका असणा-या क्षेत्रात दुचाकी वापरण्याची आवश्यकता असल्यास समूहाने जावे.
१०) वनक्षेत्रात जाताना अथवा येताना प्रवेशद्वारावर तशी नोंद न चुकता करण्यात यावी.
११) वनक्षेत्रात कोणत्याही अशासकीय व्यक्तीस घेऊन जावयाचे असल्यास तशी परवानगी संबंधित उपसंचालक अथवा क्षेत्र संचालक यांच्याकडून घेणे आवश्यक राहील. तसेच वनक्षेत्रात अशासकीय व्यक्तीस नेले असताना दुर्घटना घडल्यास नेणारा अधिकारी-कर्मचारी त्यासाठी जबाबदार राहील.
१२) वनक्षेत्रात खूप आवश्यक असेल त्याशिवाय रात्रीचा प्रवास करु नये. प्रवासाची गरज भासल्यास समूहाने जावे.
१३) शस्त्र, टॉर्च, लाठी हे सोबत असावे. आवश्यक असल्यास याबाबतची मागणी वरिष्ठांना करण्यात यावी.
१४) टी-१२ या वाघीणीचा वावर असणा-या क्षेत्रात पुढील आदेशापर्यंत कोणत्याही कारणास्तव पायी जाऊ नये अथवा वाहनाखाली उतरु नये. याबाबत विशेष सुचना सर्व मार्गदर्शक / वाहनचालक यांना उपसंचालक (कोर) यांनी त्यांचे स्तरावरुन दयावे.
१५) मनुष्य-वन्यजीव संघर्षाच्या प्रसंगी मदतीसाठी जणा-या विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या कर्मचा-यांनी वन्य प्राण्याच्या जवळ विना नियोजन जाऊ नये. सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे.
१६) पशुधन हानीच्या प्रकरणात वाघाने पाळीव जनावर मारल्यानंतर वाघ आसपासच राहतो. त्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्यास दुर्घटनेची शक्यता असल्याने अशा ठिकाणी लगेच जाऊ नये. तसेच नंतर जाताना वर दिल्याप्रमाणे सुरक्षेची काळजी घेऊनच जावे. ही बाब विचारात घेऊन प्रत्येक प्रकरणी मदत मंजूर करण्यात सहाय्यक वनसंरक्षक यांनी योग्य कार्यवाही करावी.
संदर्भ
0 Comments