MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

जमीनीत पाणी साठवणारा जीव. खेकडा

 जमीनीत पाणी साठवणारा जीव. खेकडा
     मानवाने पृथ्वीवर हजारो वेळा जन्म घेतला तरी त्याला जैवविविधता समजून घ्यायला तेवढे जन्म अपुरेच पडतील. कारण जसा विचार तसे मन आणि जसे मन तसा माणूस असतो. पर्यावरणातील प्रत्येक घटक हा पंढरपूरच्या पांडुरंगासारखा प्रत्येक मानवाच्या मदतीसाठी निस्वार्थपणे धावून येत असतो. दुःख एकच वाटते की पंढरपूर पांडुरंग भेटीसाठी करोडो भाविक वारीला जातात मात्र माझा पर्यावरणीय घटकाच्या नशीबी मात्र नेहमीच उपेक्षाच असते. 
        नक्की कोण कुणाच्या जीवावर जगतोय हेच मनुष्य समजून घ्यायलाच तयार नाही व त्याचे हेच समजून न घेणं एकदिवस मात्र पृथ्वीवरील मानवीय अस्तित्वच संपुष्टात आनेन यात शंकाच नाही.
      भगवंताने सृष्टी निर्माण करताना प्रत्येक जीव घटकाला एक विशिष्ट प्रकारच्या कामाच्या जबाबदारीचे वाटप अगदी सुक्ष्म पध्दतीने केले आहे. जसे पक्षांमध्ये गिधडास व प्राण्यांमध्ये तरसाला निसर्गाचा सफाई कामगार म्हणून गणले जाते तसेच रानडुक्करास जंगलाचा शेतकरी म्हणून संबोधले जाते. कारण जंगलात विविध झाडांच्या फळांच्या पडलेल्या बिया खुराने गाडण्याचे काम हा रानडुक्कर प्राणी करत असतो. तर इतर प्राणी व पक्षी आपल्या विष्ठेतुन बीया पेरण्याचे काम करत ही सजीव सृष्टी तारण्याचे काम करत असतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही सजिवसृष्टी जगविण्यासाठी आवश्यक असते ते पाणी.      

      पृथ्वीवर पाणी टिकले तर सर्व जीव अबाधित राहू शकतात. अन्यथा पृथ्वीचे स्मशानभूमीत रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. भू-गर्भात पाणी साठले तरच जीवसृष्टी जगु शकेल अन्यथा विनाश अटळ आहे. जमीनीत पाणी साठवणारा पृथ्वीवर पावसाळ्यात वेगाने वाढणारा जीव म्हणजे खेकडा. खेकडा मादी एकाच वेळी शेकडो पिल्लांना जन्म देते व त्या पिल्लांची वाढ पण अगदी झपाट्याने होते. विशेष म्हणजे हे खेकडे आपल्याला राहण्यासाठी लगेच जमीन पोखरून बीळ पाडायला सुरुवात करतात व याच दरम्यान त्यांच्याकडुन एक महत्त्वपुर्ण क्रिया घडते ती म्हणजे भू-गर्भात पाणी जिरवण्याची. जमीनीत लाखो होल घेण्याचे काम हा "खेकडा" करत असतो. म्हणुनच तर परमेश्वराने सगळ्यात जास्त पिल्लांना एकाच वेळी जन्म देण्याचे वरदान व ताकद या जीवाला दिली आहे. कारण एकच आहे ते म्हणजे कमी वेळात जास्त जलयुक्त शिवाराची कामं या जीवाला करावयाची असतात आणि भु गर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी मदत करायची असते. 
      आपण सगळे जेव्हा शेती करतो तेव्हा या शेतीला पाणी पुरवठा याच खेकड्याच्या योजनेतून मिळालेला असतो मित्रांनो. म्हणून सांगावेसे वाटते की हा जीव आपली जर तहान भागवण्यासाठी योगदान देत असेल तर आपणही यांना जगविण्यासाठी योगदान नक्कीच द्यायलाच हवे. मित्रांनो पर्यावरण संवर्धनासाठी नक्कीच योगदान द्या. 
               जय पर्यावरण 🌳 🌳 
   लेख /छायाचित्र रमेश खरमाळे, माजी सैनिक 
                    मो. ८३९०००८३७०

Post a Comment

0 Comments