MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

पी ओ आर ( POR) वर लिहावयाच्या नंबर बद्दल संभ्रम

 पी ओ आर  ( POR) वर लिहावयाच्या नंबर बद्दल संभ्रम

राजेंद्र धोंगडे.Rajendra Dhongade
सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक

वन अपराध निदर्शनास आल्यास गुन्हा नोंदविण्यासाठी महाराष्ट्र वनविभागात चतकोर कागदाचे एक प्रपत्र गेली पन्नास एक वर्षे प्रचलित होते. त्यात गुन्ह्या संबंधी किमान आवश्यक असणारी माहिती लिहिण्यासाठी देखील बिंदू नव्हते. कागदाचा आकार अक्षरशः चतकोर होता त्यामुळे गुन्ह्याबद्दल वर्णन देखील लिहिणे अशक्य होते. त्यात बदल करावा, आकार मोठा करावा, आवश्यक बिंदूंचा अंतर्भाव करावा असे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जाणवत होते पण वनसंरक्षण, वन अपराध अन्वेषण हे मुद्दे वन प्रशासनाच्या प्राधान्य यादी वर नसल्याने "ठेवीले अनंते तैसेचि रहावे" हे संत वचन मनोभावे पाळले जात होते. 

POR Old Copy | FOR Old Copy

वन अपराधाचे पाहिले प्रतिवृत (POR) चा जुना नमुना


पण प्रशासनातील काही मोजक्या संवेदनशील अधिकाऱ्यांना ती तृटी जाणवत होती आणि एक क्षण असा आला की पी ओ आर चे प्रपत्र बदलण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची संधी त्यांच्या कडे चालून आली. बरीच चर्चा होऊन नव्या ए फोर आकाराच्या प्रपत्राचे रूप तयार झाले. शासनाचे शिक्कामोर्तब होऊन ते बाहेर पडले.  चार प्रतीतील पंचवीस पानांचे एक एक पुस्तक करण्यात आले व त्यावर राज्य स्तरावरून संनियंत्रण असावे म्हणून पुस्तकावर चार आकडी पुस्तक क्रमांक व प्रत्येक पानावर सहा आकडी क्रमांक छापण्यात आला. जुने छोटेखानी पुस्तके क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून परत घेण्यात आली. 
FOR New Format
वन अपराधाचे पाहिले प्रतिवृत (POR) चा सुधारित नमुना

गुन्हा नोंदविण्याचे नियमात बदल करण्यात आले नव्हते फक्त तपशील व्यवस्थित नोंदविण्यात यावा म्हणून विस्तार करण्यात आला होता. पण नवीन बदल समजून घेणे, त्या वर चर्चा करणे आवश्यक तिथे मार्गदर्शन घेणे अशा गोष्टी वन विभागात सहजासहजी स्विकारल्या गेल्या तर ते वन विभाग कसे असेल ? 
पी ओ आर नोंदविण्यासाठी सर्व संवर्गातील अधिकाऱ्यांना प्राधिकार देण्यात आलेले असून कॅलेंडर वर्षात ( जानेवारी ते डिसेंबर) अनुक्रमांक / वर्ष , जसे १ /२०२४ , २/ २०२४ ज्या त्या अधिकाऱ्याने लिहायचे आहेत. जुन्या प्रपत्र काळात   देखील अशाच सूचना अस्तित्वात होत्या फक्त वनक्षेत्रपालाची एक प्रत वाढली इतकेच. 
पण बऱ्याच अधिकाऱ्यांनी अफलातून तर्क लढवला , प्रत्येक पी ओ आर वर छापील नंबर असेल तर हाताने वेगळा नंबर का लिहायचा ? तोच आपला गुन्हा नंबर राहील फक्त वर्ष आणि दिनांक लिहीता येईल. जिथे ५/२०२४ म्हणजे २०२४ या वर्षातील त्या कार्यक्षेत्रातील हा पाचवा गुन्हा आहे असे साधे माफक व बाळबोध कारण होते तिथे आता पुस्तक नंबर/ पृष्ठ नंबर, जसे ३४५६/ १२३४५६ असे भव्यदिव्य आकडे अवतरू लागले. काही ठिकाणी तर विचीत्र प्रसंग उदभवले. एका न्यायालयात एकाच दिवशी एकाच वनविभागातील दोन वनरक्षकांनी पी ओ आर सादर केले. एकाने ६/ २०२४ हा पी ओ आर कोर्टापुढे ठेवला तर दुसऱ्याने  ३४५६/ १२३४५६ या नंबरचा पीओआर ठेवला. न्यायालय गडबडून गेले त्यांनी खुलासा विचारला पण वन विभागात कायदा नियम या पेक्षा साहेबाचे तोंडी आदेश हे ब्रम्ह वाक्य असल्याने  "सहा आकडीवाला" बिनधास्त राहिला. न्यायालयाला त्या दिवशी कळाले की वनाधिकाऱ्याच्या दरबारात देशातील कायदे व नियम लागू होत नसतात . 

Forest Offence copy



FOR New Format




आज उभ्या महाराष्ट्रात ३/२०२४ लिहिणारे पुराणमतवादी आणि ३४५६/१२३४५६ असे अवाढव्य छापील आकडे वापरणारे नवमतवादी आपापल्या परंपरेला चिटकून आहेत. कधी एकेकाळी कॅथाॅलिक व प्राॅटेस्टंट ज्या तावातावाने आपले विचार ठाम पणे मांडत ( भांडत ) होते तसे वैचारिक महायुद्ध वनविभागात चालू आहे. कुंभकर्णीय  प्रशासनाला जाग आली तरच हे महायुद्ध थांबू शकेल. 


राजेंद्र धोंगडे.Rajendra Dhongade
सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक

Post a Comment

0 Comments